बेळगाव : भर पावसात ऊसदर आंदोलन | पुढारी

बेळगाव : भर पावसात ऊसदर आंदोलन

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  उसाला साडेपाच हजार रुपये दर देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चन्नम्मा चौकात तासभर रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. भर पावसातही शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू होते.

उसाला प्रतिटन साडे पाच हजार रुपये देण्यात यावा, कारखान्यांचे वजन काटे तपासण्यात यावेत, तोडणी आणि वाहतूक खर्चामधील गैरप्रकार थांबवण्यात यावा, एकरकमी बिले देण्यात यावे आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात आरटीओ सर्कलमधून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा चन्नम्मा चौकात नेऊन रास्ता रोको करण्यात आला. शेतकर्‍यांनी यावेळी लोटांगण घालत निषेध व्यक्त केला. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाने समाधान न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चुनाप्पा पुजारी म्हणाले, सरकारने जाहीर केलेली एफआरपी फसवी आहे. गेली दहा वर्षे आम्ही प्रति टन 2 हजार 600 रुपये घेत आहोत. आता डिझेल, पेट्रोल, खत, मजुरीचे भाव वाढले आहेत. राज्यामध्ये उसाच्या करापोटी 27 हजार कोटी रुपये जात आहेत. सरकार प्रतिटन 4 हजार 500 रुपये कर देत आहे. त्यामुळे सरकारने यातील दोन हजार रुपये आणि एफआरपी साडेतीन हजार रुपये असे एकूण साडेपाच हजार रुपये प्रतिटन दर द्यावा. अन्यथा आम्ही कारखाने सुरु होऊ देणार नाही. जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, साखरमंत्र्यांशी आमची चर्चा घडवून आणावी. जिल्हाधिकारी पाटील यांनी दर जाहीर करुन कारखाने सुरु करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. वजनकाटे तपासले जातील. वाहतूक आणि तोडणी खर्चा कसा आकारला आहे. यासंदर्भात समितीने नेमून चौकशी केली जाईल. एफआरपी हा केंद्र शासनाच्या अखत्यारितला विषय आहे. याबाबत राज्य शासनाशी चर्चा करण्यासाठी मुदत देण्यात यावी. तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात यावे, असे सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांच्या या आश्वासनाने शेतकर्‍यांचे समाधान न झाल्याने शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ केला. यावेळी प्रकाश नायक, शशिकांत पडसलगी, विजय कुमार, राघवेंद्र नायक, शिवानंद मुगळेहाळ, सुरेश परगण्णावर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवली

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनाने समाधान न झाल्याने अगोदरच तयारींनी आलेल्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवून स्वयंपाकाची तयारी सुरु केली. सायंकाळी आंदोलनस्थळी गाद्या आणून धरणे आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.

Back to top button