बेळगाव : बालकाचे शीर धडावेगळे करून खून | पुढारी

बेळगाव : बालकाचे शीर धडावेगळे करून खून

बेळगाव, हुक्केरी; पुढारी वृत्तसेवा :  आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलाचे शीर धडावेगळे करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार हुक्केरी तालुक्यातील गुडस येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यापैकी मुख्य संशयित वृद्ध आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून केल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. नुरूद्दिन जैनूल कोन्नूर (वय 55, रा. होसूर, ता. हुक्केरी) व हणमंत आण्णाप्पा बेवनूर (42, होसूर, ता. हुक्केरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

गुडस येथे मामाकडे शिकणारा मल्लाप्पा वासप्पा माने (मूळ रा. नाईंग्लज, ता. चिकोडी, सध्या रा. होसूर, ता. हुक्केरी) हा शाळकरी मुलगा 17 सप्टेंबर रोजी सायकलवरून शाळेला निघाला होता. परंतु, सायंकाळी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याची आई व मामाने हुक्केरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख महानिंग नंदगावी व गोकाकचे उपअधीक्षक मनोजकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके बनवून तपास सुरू झाला. संकेश्वरचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, यमकनर्डीचे उपनिरीक्षक व हुक्केरी पोलिसांनी आठवडाभरात तपास करत दोघांना जेरबंद केले.

शीर धडावेगळे

17 रोजी शाळेला जाताना मल्लाप्पाला मुख्य संशयित नुरूद्दिन कोन्नूर याने रस्त्यात अडवले. त्याला फूस लावून सोबत नेले व घरी नेऊन त्याला ठार केले. यानंतर दिवसभर मृतदेह घरीच ठेवला. यानंतर त्याने मदतीसाठी मित्र हणमंत बेवनूर याला बोलावून घेतले. दोघांनी मिळून या मुलाचे शीर धडावेगळे केले. रात्रीच्यावेळी शीर वेगळ्या तर धड वेगळ्या पोत्यात भरून ते हिरण्यकेशी नदीत नेऊन फेकले. शिवाय सायकल व दप्तर एका तलावात फेकले

टायमुळे शोधाला दिशा

20 सप्टेंबररोजी शाळकरी मुलाचे धड हिरण्यकेशी नदीत मिळाले. परंतु, मृतदेह कुजल्याने ओळख पटत नव्हती. शिवाय अंगावर गणवेशाची हाफ पॅन्ट वगळता अन्य कपडेही नव्हते. परंतु, धडावर शाळेचा टाय दिसून आला. या टायच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला. हा कोणत्या शाळेच्या गणवेशाचा टाय आहे, ही माहिती घेतली असता शाळेचे नाव समजले. त्या शाळेत जाऊन चौकशी केली असता मल्लाप्पा नामक विद्यार्थी बेपत्ता असल्याचे कळाले. त्यानंतर तपास करून दोघांना अटक करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून त्या दोघांना मल्लाप्पाला मारल्याचे पोलिस प्रमुखांनी सांगितले.

डोके लढवले, पण अडकलेच

नुरूद्दिन व हणमंत यांनी आपण सापडू नये म्हणून शीर धडावेगळे केले. नुरूद्दिनने धड नेऊन नदीत फेकले तर हणमंतने शीर नेऊन दुसरीकडे फेकले होते. परंतु, धड मिळाल्यानंतर टायच्या आधारे पोलिसांना शोध घेताला आला. अद्याप शीर मिळाले नसून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Back to top button