बेळगाव : योजना अंमलबजावणीत जिल्हा टॉप टेनमध्ये | पुढारी

बेळगाव : योजना अंमलबजावणीत जिल्हा टॉप टेनमध्ये

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  केंद्र सरकारच्या योजनांची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यामध्ये देशात बेळगाव जिल्ह्याने 10 वा क्रमांक पटकावला असून पुरस्कार वितरण सोमवार, दि. 26 रोजी दिल्लीत होणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. रविवारी दिल्लीला रवाना झाले आहेत.

केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून बेळगाव जिल्ह्याने देशात दहावा क्रमांक पटकावला आहे. आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालविकास, कामगार विभागासह 9 विभागांच्या 17 प्रकल्पांच्या प्रगतीचा विचार करून ही श्रेणी दिली आहे.
‘आझादी से अंत्योदय तक’ मोहीम केंद्र सरकारने 12 एप्रिल 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत राबवली होती. यामध्ये देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 75 जिल्हे या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत केंद्र सरकारच्या 9 निवडक विभागांचे 17 प्रकल्प प्रभावीपणे राबवून बेळगाव जिल्ह्याने नागरिकांना व लाभार्थ्यांना उत्कृष्ट सेवा देऊन 84.85 टक्के यशस्वी कामगिरी नोंदवली.

बेळगाव जिल्ह्याच्या या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांना सन्मान व पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले आहे. यासाठी दिल्ली येथील नियोजन विभागाचे संचालक रवी बंगरेप्पनावर यांनी नवी दिल्लीत आमंत्रित केले आहे.  26 रोजी नवी दिल्ली येथील हॅबिटॅट सेंटर येथे पुरस्कार समारंभ होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. उपस्थित राहणार आहेत.

केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये जिल्ह्याने दहावा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये जनता, अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यामुळे जिल्ह्याची मान उंचावली आहे.

– नितेश पाटील, जिल्हाधिकारी, बेळगाव

Back to top button