बेळगाव: मादी बिबट्याचे मूत्र शिंपडून शोधमोहीम | पुढारी

बेळगाव: मादी बिबट्याचे मूत्र शिंपडून शोधमोहीम

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा: गोल्फ मैदानाच्या झाडीत लपलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आता वन खात्याने मादी बिबट्याच्या मूत्राचा अवलंब केला आहे. जनावरांचे मांस आणि हाडांवर मादी बिबट्याचे मूत्र शिंपडून हे मांस परिसरात 9 ठिकाणी ठेवण्यात आले आहे. मूत्राच्या वासाने बिबट्या या मांसाकडे आकर्षिला जाईल, अशी वनाधिकार्‍यांची अपेक्षा आहे. मात्र, शुक्रवारीही बिबट्या हाती आला नाही.

वन खात्याने नाना उपाय राबविले तरी बिबट्या 5 ऑगस्टपासून जाळ्यात सापडलेला नाही. शोधमोहीम पहाटेपासून रात्री अंधार पडेपर्यंत राबवली जात आहे. शिमोग्याहून दोन प्रशिक्षित हत्ती मागवून त्यांच्या सहाय्यानेही शोध सुरू ठेवला तरी सलग तिसर्‍या दिवशीही बिबट्याने हत्तींना हुलकावणी दिली. त्यामुळे शुक्रवारी शोध मोहीम सुरू करण्यापूर्वी मादी बिबट्याच्या मूत्राची मात्रा वापरण्यात आली. मात्र, शुक्रवारीही अपयश आले.

गोल्फ मैदान परिसात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या बिबट्याच्या छबीच्या आधारे मोहीमेची दिशा ठरविण्यात येत आहे. शोध पथकाला गुरुवारी सायंकाळी हिंडलगा विनायक मंदिर परिसरात असणार्‍या झाडीत बिबट्या निदर्शनास आला होता. त्यानंतर तो गायब झाला आहे. शुक्रवारी तो कॅमेर्‍यातही दिसला नाही की वन पथकाच्या नजरेसही पडला नाही.

शोध मोहिमेत 2 हत्ती, 180 वन कर्मचारी, 8 शार्प शूटर सहभागी आहेत. 22 सीसीटीव्ही कॅमेरे, 7 सापळे लावण्यात आले आहेत. वन खात्याने हत्ती पथकावर अधिक आशा ठेवली होती. पण, हत्ती येऊनही तीन दिवस झाले तरी यश मिळालेले नाही. त्यामुळे मादी बिबट्याच्या मूत्राचा वापर करुन जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

Back to top button