बेळगाव : स्वामीकडून आधी फसवणूक, मग चाकूहल्ला | पुढारी

बेळगाव : स्वामीकडून आधी फसवणूक, मग चाकूहल्ला

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  सरकारी नोकरी देतो असे सांगून कथित स्वामीने एका तरुणाकडून 4 लाख रु. घेतले. सहा महिने झाले तरी नोकरी न मिळाल्याने तरुण रक्‍कम परत मागण्यास गेला. तर त्या तरुणावर स्वामीने साथीदारांसह चाकू हल्ला केला. पोलिसांनी स्वामीला अटक केली आहे. अल्लमप्रभू हिरेमठ (रा. हळ्ळूर, ता. मुडलगी) असे त्याचे नाव आहे.

घरशांती, मनःशांतीसाठी होमहवन, भक्‍तांना लिंबू, नारळ मंत्रून देणारे स्वामी सर्वांना परिचित आहेत. परंतु, त्याही पुढे जाऊन सरकारी नोकरी लावणारा स्वामी बेळगाव जिल्ह्यातील हळ्ळूर येथे उदयास आला. अल्लमप्रभू असे नाव धारण केलेल्या या स्वामीचे परिसरात नाव होते. अंधभक्‍तीचा फायदा घेत भक्‍तांना फसविणे स्वामीकडून सुरूच होते. त्याने आपल्याकडे येणार्‍या तरुण भक्‍तांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिषही देणे सुरू केले.

मुडलगी येथील संतोष हवळेव्वागोळ या तरुणाला स्वामीने एससी कोट्यातून ‘ड’ वर्गात सरकारी नोकरी देतो, असे सांगितले.
या नोकरीसाठी म्हणून त्याच्याकडून 4 लाख रूपये घेतले. परंतु, 6 महिने लोटले तरी स्वामी नोकरी काही लावत नव्हते.
15 ऑगस्ट रोजी संतोष त्याच्याकडे गेला आणि एकतर नोकरी लावा अन्यथा माझी रक्कम परत द्या, असे म्हणत वाद घालू लागला. वादाचे पर्यवसान अर्वाच्च शब्दात झाले. तेव्हा स्वामीने सहकार्‍यांना सोबत घेऊन संतोषवर चाकूने हल्ला केला. संतोषच्या पाठीत, पायावर व शरीराच्या अन्य भागांवर वार करत त्याला जखमी केले. या प्रकरणी संतोषने स्वामीविरोधात मुडलगी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वामीला अटक केली आहे.

बंगळूरच्या एकाचीही फिर्याद
संशयित अल्लमप्रभू हिरेमठ याच्यावर हा यापूर्वी आणखी एक गुन्हा दाखल झाल्याचेही समोर आले आहे. बंगळूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी ईव्हीएम हॅक करून तुम्हाला निवडून देतो, असे सांगून एकाकडून पाच लाख रूपये घेतले होते. परंतु, ही चक्क फसवणूक असल्याचे लक्षात आल्यानंतर बंगळूरचे रहिवाशी प्रशांत कुमार यांनी या स्वामीविरोधात मुडलगी पोलिसांत फिर्याद दिली होती.

Back to top button