बेळगाव : यंदाही गणपतीसाठी खड्ड्यातूनच प्रवास! | पुढारी

बेळगाव : यंदाही गणपतीसाठी खड्ड्यातूनच प्रवास!

खानापूर; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव-पणजी महामार्गाच्या अर्धवट कामामुळे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी धोकादायक डबक्यांचे रूप धारण केले आहे. चार चाकी वाहनांचे बंपर खड्ड्यांना घासत असून वाहने अडकून पडण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांजवळ आल्यानंतर खाली उतरून कार रिकामी करून पुढे न्यावी लागत आहे. अशा खड्डेमय रस्त्यावरूनच यंदाही चाकरमान्यांना गणेश चतुर्थीसाठी प्रवास करावा लागणार आहे.

खानापूर-रामनगर-अनमोड या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष आणि पावसामुळे खड्ड्यांनी धारण केलेले धोकादायक स्वरूप यामुळे प्रवासी वर्ग वैतागला असून महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराच्या नावाने लाखोली वाहिली जात आहे.

खानापूर तालुक्यातील होनकल ते जोयडा तालुक्यातील अनमोडपर्यंत जागोजागी रस्त्याचे काम तसेच पूल व मोरी उभारणीचे काम अर्धवट स्थितीत आहे. या सर्व ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
रस्त्याच्या उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश कंत्राटदाराला प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी कंत्राटदार आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. हुबळी येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून कामाचे आदेश देण्यास दिरंगाई केली जात असल्याने कंत्राटदाराने आता थेट दिल्ली येथून कामाचे आदेश मिळवण्यासाठी धावपळ चालविली आहे.

कंत्राटदार दिल्लीकडे
सोमवारी 22 ऑगस्टरोजी कंत्राटदाराचे प्रतिनिधी दिल्लीला जाणार असून त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती आणि उर्वरित कामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तोपर्यंत ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार असल्याने सलग तिसर्‍या वर्षी गणरायाचे खड्ड्यातूनच स्वागत करावे लागणार आहे.

चार चाकी वाहने अडकून पडणे, खड्ड्यात कलंडणे, यासारखे प्रकार नित्याचे झाले आहेत. गणेशोत्सवात रहदारीत मोठी वाढ होणार आहे. त्यापूर्वी धोकादायक खड्ड्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पावसाचा मारा कमी झाल्यावर रस्ता कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तोपर्यंत प्रवाशांनी कंबरडे मोडणार्‍या खड्ड्यातूनच प्रवास करावा का?
-राजेश पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष शिंदोळी

Back to top button