बेळगाव : सिंगिनकोप मराठी शाळेची इमारत कोसळली | पुढारी

बेळगाव : सिंगिनकोप मराठी शाळेची इमारत कोसळली

खानापूर; पुढारी वृत्तसेवा :  सिंगिनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेची 65 वर्षे जुनी इमारत संततधार पावसामुळे जमीनदोस्त झाली. शाळेत कोणी नसताना ही घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दोन महिन्यांपासून जीर्ण झालेली इमारत कधीही कोसळण्याचा धोका ओळखून तेथे वर्ग चालविणे बंद करण्यात आले होते. पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग गावच्या समुदाय भवनात तसेच जवळ असलेल्या कन्नड प्राथमिक शाळेत भरविण्यात येत आहेत. 1957 सालाचे कौलारू बांधकाम असलेली ही इमारत जीर्ण झाली होती. ती संततधार पावसामुळे मंगळवारी रात्री कोसळली.

शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत 42 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांचे छत हरवल्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांवर गावभर फिरण्याची वेळ आली आहे. गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांनी नूतन इमारत मंजूर करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button