बेळगाव : तालुक्याला संततधार पावसाने झोडपले; मार्कंडेय नदी दुसर्‍यांदा पात्राबाहेर | पुढारी

बेळगाव : तालुक्याला संततधार पावसाने झोडपले; मार्कंडेय नदी दुसर्‍यांदा पात्राबाहेर

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव तालुक्याला पावसाने दोन दिवसांपासून झोडपून काढले आहे. यावर्षी दुसर्‍यांदा मार्कंडेय नदी पात्राबाहेर पडली आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पिके पाण्याखाली गेल्याने नदीकाठावरील शेतकरी धास्तावले आहेत. पश्‍चिम भागात पूर्वभागापेक्षा पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे राकसकोप धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राकसकोप धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे.

पावसाचा जोर वाढल्याने मार्कंडेय नदीतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदी पात्राबरोबर वाहत आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असणार्‍या संततधार पावसाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. सुळगा येथील केंबाळी नाला फुटल्याने परिसरातील पिकांना याचा फटका बसला. पिके पाण्याखाली गेली आहेत.

मागील दहा दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शिवारातील पाणी कमी झाले होते. मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत घट झाली होती. राकसकोप परिसरात झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

मागील काही दिवसांपासून शेतकर्‍यांकडून भात रोपलागवडीसाठी पावसाची प्रतीक्षा करण्यात येत होती. त्यानंतर पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. रविवारी दिवसभर पावसाचा जोर होता. त्यामुळे सायंकाळपर्यंत मार्कंडेय नदी पात्राबाहेर पडली. परिसरातील ओढे-नाले यामधील पाणीपातळी वाढली आहे. यामुळे शेतकर्‍यांना सध्या दिलासा मिळाला आहे.

बेनकनहळ्ळी केंबाळी नाल्यावर पावसाचे पाणी आले होते. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागली. काकती, कंग्राळी भागात पावसाचे पाणी शिवारात भरते. पाण्याचा निचरा लवकर होत नाही. परिणामी पिके कुजण्याची शक्यता असते. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. बटाटा उत्पादक शेतकर्‍यांनाही अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतकर्‍यांना पुन्हा धास्ती

पावसाचा जोर अधिक आहे. रविवारी रात्रभर पावसाने परिसराला झोडपून काढले. याचा फटका नुकताच भात रोपलागवड केलेल्या पिकाला बसणार आहे. अद्यात तालुक्यातील अनेक भागात रोपलागवडीची कामे सुरू आहेत. अखेरच्या टप्प्यात रोपलागवड केलेल्या पिकांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.

Back to top button