बेळगाव : अलमट्टी धरणातून ६ हजार क्युसेक विसर्ग सुरू | पुढारी

बेळगाव : अलमट्टी धरणातून ६ हजार क्युसेक विसर्ग सुरू

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : अलमट्टी धरणातून रविवारी पुन्हा सकाळी आठपासून सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरुरूकरण्यात आला. अलमट्टी धरण आता 93 टक्के भरले आहे. गेले तीन दिवस या धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. जिल्ह्यातील आणि बेळगाव जिल्ह्यावर परिणाम करणारी महाराष्ट्रातील धरणेही आता 70 टक्क्यांहून अधिक भरली आहेत.

अलमट्टी धरणाची क्षमता 123.01 टीएमसी असून या धरणामध्ये सध्या 114.733 टीएमसी पाणीसाठा आहे. या धरणात 30 हजार 138 क्यूसेक पाण्याची आवक होत असून, शुक्रवारपासून या धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. तो रविवारी सकाळी 8 पासून पुन्हा 6 हजार क्यूसेक करण्यात आला आहे.

मार्कंडेय धरण 87 टक्के भरले आहे. मलप्रभा धरणात 26.518 टीएमसी पाणीसाठा असून, याची क्षमता 37.731 टीएमसी आहे. या धरणात 294 क्युसेक पाण्याची आवक होत असून, 294 क्युसेक विसर्ग ठेवण्यात आला आहे.

घटप्रभा धरणात (राजा लखममौडा जलाशय) 39.625 टीएमसी पाणीसाठा असून, याची क्षमता 51 टीएमसी आहे. या धरणात 3 हजार 282 क्युसेक पाण्याची आवक होत असून, विसर्ग 166 आहे.

मार्कंडेय धरणामध्ये 3.185 टीएमसी पाणी साठले असून, याची क्षमता 3.669 टीएमसी आहे. या धरणात 727 क्युसेक पाण्याची आवक होत असून विसर्ग 727 आहे.

बेळगाव जिल्ह्यावर परिणाम करणारी महाराष्ट्रातील धरणेही आता 70 टक्क्याहून अधिक भरली आहेत. कोयना धरण 63, वारणा 81, दूधगंगा 73 आणि राधानगी धरण 80 टक्के भरले आहे.

अलमट्टी

Back to top button