बेळगाव : हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगाई यात्रा | पुढारी

बेळगाव : हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगाई यात्रा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  गोरगरीब, विनकर, कष्टकर्‍यांची देवी म्हणून श्रद्धा असणारी वडगाव येथील मंगाई देवीची वार्षिक यात्रा अमाप उत्साहात मंगळवार दि. 26 रोजी सुरू झाली. दिवसभरात बेळगाव शहर परिसरासह जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. झेंडूच्या फुलांच्या माळांनी तसेच विद्युत रोषणाईने सजविलेले मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोमवारी रात्री 12 वा. मंदिरात धार्मिक विधी संपन्न झाले. मंगळवारी सकाळी अनगोळ येथील धनगरी ढोल वादन पथकांद्वारे मिरवणुकीने वडगाव परिसरातील विविध देवस्थानामध्ये जाऊन पूजन करण्यात आले. दुपारी बारा वाजता मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर गार्‍हाणे उतरण्याच्या कार्यक्रमानंतर मुख्य यात्रेला सुरुवात झाली. प्रशासनासह देवस्थानचे हक्कदार चव्हाण-पाटील परिवारातर्फे यात्रेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे.

मंगळवार मुख्य दिवस असल्याने दिवसभरात लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. गेल्या दोन वर्षात व्यापारामध्येही मंदी होती. मात्र यंदा मोठी उलाढाल होत आहे. लाखो भाविकांनी बेळगाव परिसरात सुख समृद्धी लाभू दे, परिसराचा भरभराटीने विकास होऊ दे, अशी इच्छा व्यक्त करत देवीचे दर्शन घेतले.

दुपारी गार्‍हाणे झाल्यानंतर भाविकांकडून श्रीफळ वाढविणे तसेच ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. यानंतर मुख्य यात्रेला प्रारंभ झाला. मंदिराला आकर्षक प्रवेशद्वार केले असून भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेड्स लावून महिला तसेच पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या. महापालिका प्रशासनाने तसेच पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेतली आहे.

वडगाव येथील नगरसेविका दीपाली टोपगी, सारिका पाटील, मंगेश पवार यांच्यासह चव्हाण-पाटील परिवाराच्या सदस्यांकडून मंगाई मंदिराजवळ प्राथमिक उपचार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. भाविकांना आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास झाल्यास या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मंदिराजवळील पाटील गल्ली, यरमाळ रोड, विष्णू गल्ली, धामणे रोड, वझे गल्ली या ठिकाणी छोट्या मोठ्या दुकानांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

भाविकांत उत्साह
कोरोना निर्बंधामुळे गत दोन वर्षे यात्रा साजरी करण्यात आली नव्हती; मात्र यंदा कोरोना निर्बंधमुक्त वातावरण असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ग्रामदैवत मंगाई देवी यात्रेची प्रामुख्याने परिसरातील कामगार, शेतकरी व कष्टकरी लोकांची यात्रा म्हणून ख्याती आहे. या यात्रेला सुमारे 300 हून अधिक वर्षांची परंपरा आहे.

Back to top button