बेळगाव : हिडकल डॅम येथे तरुणाचा खून | पुढारी

बेळगाव : हिडकल डॅम येथे तरुणाचा खून

हुक्केरी; पुढारी वृत्तसेवा :  यमकनमर्डी पोलिस स्थानकाच्या व्याप्तीतील हिडकल डॅम येथे दिवसाढवळ्या डोळ्यात मिरचीपूड टाकून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. परशुराम सिद्धलिंग हलकर्णी (वय 30, रा. हिडकल डॅम) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिस स्थानकात झाली आहे. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

बसवराज भरमाप्पा गळते (वय 30), मंजुनाथ लक्ष्मण पुटजाने (वय 24), केंपण्णा अर्जुन नेसरगी (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापैकी दोघे स्वत:हून पोलिस स्थानकात हजर झाले.  खून प्रकरणी मृत परशुराम याच्या पत्नीने आठ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

परशुराम हलकर्णी हा दुकानदार असून अटक करण्यात आलेला बसवराज गळते या दोघांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून वाद निर्माण झाला होता. गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलीबरोबर प्रेम करून बसवराजने विवाह केला आहे. याबाबतची माहिती परशुरामने सदर व्यक्तीला दिली असल्याचे कारण सांगून दोघांमध्ये वैर निर्माण झाले होते. यामुळे बसवराज त्याच्याबरोबर वरचेवर वाद घालत होता.

मुलांमध्ये क्रिक्रेट खेळण्या कारणातून वाद झाला होता. सदर प्रकरण गावातील ज्येष्ठ नागरिकांनी समजूत घलून मिटवले होते. तसेच जोराने कार चालवल्याचा जाब विचारल्याच्या कारणातूनही त्यांच्यात वाद झाला होता.

याप्रकरणी यमकनमर्डी पोलिस स्थानकात तक्रार ही दाखल करण्यात आली आहे. बसवराज व त्याच्या सहकार्‍यांनी मिळून आपल्या पतीचा खून करण्याचा कट रचला होता. दि. 16 रोजी परशुराम हिडकल डॅमजवळील मारुती मंदिरकडे दुचाकीवरुन जाताना बसवराज व त्याच्या साथीदारांनी कारने दुचाकीला धडक दिली.

दुचाकीवरुन खाली पडलेल्या परशुरामच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून 7 ते 8 जणांनी लाथाबुक्क्यांनी मारुन खून केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. फरार झालेल्यांचा तपास घेण्यात येत आहे. यमकनमर्डी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Back to top button