बेळगाव : मार्कंडेय काठाला इशारा | पुढारी

बेळगाव : मार्कंडेय काठाला इशारा

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  राकसकोप जलाशय भरण्याच्या स्थितीत असून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत असल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडून कधीही विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाने केलेे आहे. दरम्यान, दुपारनंतर शहर परिसरात संततधार पाऊस झाला. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. चिकोडी-निपाणी परिसरातील आठ बंधारे शनिवारीही पाण्याखालीच होते.

राकसकोप जलाशयातून बेळगाव शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलाशयाची क्षमता 2,475 फूट इतकी आहे. सध्या जलाशयात 2,472 फूट इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी जलाशय ‘ओव्हर फ्लो’ होण्याची शक्यता आहे.
जलाशय पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत आहे. ‘ओव्हर फ्लो’ झाल्यास जलाशयाचे सहा दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सध्या मार्कंडेय नदीला पूर आला आहे. त्यात राकसकोप जलाशयाचे पाणी सोडल्यास परिसरातील गावांत पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाने केले आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय
पाणीपुरवठा मंडळाने हिंडलगा येथील पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरण्याची भीती असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे. याबाबत हेस्कॉमने पाणीपुरवठा मंडळाला सूचना केली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवली होती.

Back to top button