बेळगाव : पार्किंगमधून कार बाहेर काढताना धडक, महिला ठार | पुढारी

बेळगाव : पार्किंगमधून कार बाहेर काढताना धडक, महिला ठार

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पार्किंगमध्ये लावलेली कार बाहेर काढताना समोर झाडलोट करणारी महिला न दिसल्याने भरधाव कारची धडक बसून महिला ठार झाली. अनिता राजेश बन्स (वय 52, मूळ रा. पीके क्‍वाटर्स, आनंदवाडी, शहापूर, सध्या हिंदूनगर, टिळकवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी 7.40 वा. गोवावेस सर्कलजवळील एलआयसी कॉम्प्लेक्समध्ये हा अपघात घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीमती अनिता बन्स या एलआयसी कॉम्प्लेक्समध्ये झाडलोट करण्यासाठी जातात. शुक्रवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे अंडरग्राऊंडमध्ये झाडलोट करत होत्या. यावेळी कारचालक गुरूराज श्रीकांत कुलकर्णी (मूळ रा. हुनशीकट्टी, ता. कित्तूर, सध्या सोमवार पेठ, बेळगाव) हे आपली कार (केए-24 एम-8545) पार्किंगमधून बाहेर काढत होते. चढावरून जाण्यासाठी त्यांनी एकदम कारचा वेग वाढवला. यावेळी येथेच झाडलोट करणार्‍या श्रीमती अनिता या समोर आल्याचे भान त्याला राहिले नाही. त्यामुळे नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारची त्यांना जोराची धडक बसली. यामध्ये त्या जागीच ठार झाल्या.

घटनास्थळी जमाव, चालकाला मारहाण

घटनेची माहिती मिळताच मृत महिलेचा मुलगा सनी बन्स घटनास्थळी दाखल झाला. अन्य नातेवाईकही येथे आले. त्यांनी कारचालकाला चांगलेच धारवेर धरले. शिवाय काहींनी पार्किंगमधून इतक्या वेगाने कशी कार काढत होता, अशी विचारणा करत मारहाण केली.
टिळकवाडीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयिताला जमावाच्या ताब्यात सोडवून घेतले. वाहतूक दक्षिण पोलिसांत नोंद झाली आहे. निरीक्षक मंजुनाथ नाईक तपास करीत आहेत.

Back to top button