बेळगाव : वर्ष होत आले तरी नगरसेवक नामधारीच; महापौर निवडणुकीसाठी मुहुर्त मिळेना | पुढारी

बेळगाव : वर्ष होत आले तरी नगरसेवक नामधारीच; महापौर निवडणुकीसाठी मुहुर्त मिळेना

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महापालिका महापौर, उपमहापौर निवडणुकीला अद्याप मुहुर्त मिळाला नाही. नऊ महिने झाले तरी हालचाली नसल्यामुळे नगरसेवकांत तीव्र संताप व्यक्त होत असून प्रभागात लोकांकडून विचारणा आणि महापालिकेत अधिकार्‍यांकडून टाळाटाळ अशा कात्रीत नगरसेवक सापडले आहेत.

सप्टेंबर 2021 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या. महापौर, उपमहापौर पदासाठी दोनवेळा आरक्षण जाहीर झाले. पण, आता तिसरे आरक्षण जाहीर होण्याची वेळ आली तरी अद्याप महापौर, उपमहापौर निवडणूक होण्याची चिन्हे नाहीत. ओबीसी कोट्यातील आरक्षणामुळे निवडणूक लांबणीवर पडत असल्याचे अधिकार्‍यांकडून आणि आमदारांकडून सांगण्यात येत आहे. पण, बेळगावबरोबरच निवडणूक झालेल्या हुबळी?धारवाड महापालिकेची महापौर, उपमहापौर निवडणूक झाली. बेळगावबाबतच अद्याप का निर्णय होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापौर, उपमहापौर निवडणूक घ्यावी, यासाठी नगरसेवकांसाठी प्रादेशिक आयुक्तांना तीनवेळा निवेदन दिले आहे. पण, अद्याप मुहुर्त निघालेला नाही. त्यामुळे नगरसेवकांत संताप व्यक्त होत आहे. प्रभागातील विकास कामे रखडली आहे. लोकांच्या प्रश्नांना तोंड देता येत नाही आणि महापालिका अधिकार्‍यांकडून दाद देण्यात येत नाही. त्यामुळे नगरसेवकांत अस्वस्थता दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत महापौर, उपमहापौर नाहीत. अधिकार्‍यांचेच राज्य चालत आहे. त्यामुळे मनमानी कारभाराला वेग आला असून लवकरात लवकर लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत.

सभागृहाविनाच अधिकारी निवृत्त

दोन वर्षांपूर्वी कौन्सील सेक्रेटरी म्हणून महादेव बनसी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या दोन वर्षांत त्यांना लोक नियुक्त सभागृहात काम करता आले नाही. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यास त्यांचे योगदान होते. सभागृहाचे कामकाजच झाले नाही. त्यामुळे एकही नगरसेवकांची बैठक न होताच ते निवृत्त झाले.

महापौर, उपमहापौर निवडणूक होणे आवश्यक आहे. राज्यातील इतर महापालिकांत या निवडणुका होत आहेत. पण, बेळगावातच का होत नाही, हा प्रश्न आहे. आम्ही अनेकदा निवेदन देवूनही त्याची दखल घेण्यात येत नाही. प्रभागात लोकांची कामे होणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरात लवकर निवडणूक प्रक्रिया पार पडावी.
– रवी साळुंखे, नगरसेवक

Back to top button