Belgaum : निपाणीत गादी कारखाना भस्मसात | पुढारी

Belgaum : निपाणीत गादी कारखाना भस्मसात

निपाणी ः पुढारी वृत्तसेवा येथील धर्मवीर संभाजी चौक परिसरातील शहराच्या मुख्य जुन्या पी. बी. रोडला लागून असलेल्या गादी कारखान्याला गुरुवारी दुपारी 2.30 च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत फर्निचर, रक्कम व दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सदानंद दत्तात्रय पाटील (मळगेकर बंधू) यांचे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन विभाग व शहर पोलिसांत फिर्याद नोंदवण्याचे काम सुरू होते. परिसरातील व्यापारी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे अन्य दुकानांचे आगीपासून होणारे नुकसान टळले. भर दुपारी ही आग लागल्याने धुराचे लोट लांबपर्यंत गेल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांना अडवण्यासाठी पोलिसांना काहीकाळ लाठीचार्ज करावा लागला. (Belgaum)

सात बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण आणण्यात आले. मात्र, ही आग सुमारे तीन तास धुमसत होती. शहरातील जुना पी. बी रोडवर गेल्या अनेक वर्षापासून सदानंद दत्तात्रय पाटील (मळगेकर बंधू) यांचा गादी कारखानावजा दुकान आहे. दुपारी अचानक आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर सदानंद पाटील यांचे चिरंजीव उत्तम पाटील यांनी आरडाओरड केली. त्यामुळे लागलीच शेजारील दुकानदार व नागरिकांनी धाव घेत शेजारील दुकानदारांना सावध करून दुकानातील साहित्य बाहेर काढण्याच्या सूचना करीत घटनेची माहिती अग्निशामक दल, पोलिस व पालिका प्रशासनाला दिली. निपाणी अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी दोन बंबासह धाव घेतली. मात्र आगीची घटना मोठी असल्याने संबंधित कर्मचार्‍यांनी तातडीने संकेश्वर, चिकोडी तसेच हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कारखान्यातील अग्निशामन विभागाशी संपर्क साधून बंबाना पाचारण केले केले. (Belgaum)

घटनास्थळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, नगरसेवक व पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांनी धाव घेत पालिकेच्या पाण्याचा टँकरलाही पाचारण केले. आग आटोक्यात येईपर्यंत मोठे नुकसान झाले. दरम्यान, घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर, बसवेश्वर चौकचे आनंद कॅरीकट्टी यांच्यासह सुमारे 20 कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अडथळा ठरत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी काहीकाळ सौम्य लाठीमार करून घटनास्थळी असलेल्या नागरिकांना इतरत्र पांगवले. दुपारी 2.30 लागलेली आग सुमारे तीन तास धुमसत होती. घटनास्थळी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, अग्निशमन विभागाचे जिल्हा निरीक्षक शशीधर निलगार, सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्यासह हेस्कॉमच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. गादी कारखान्यालामागील बाजूने आग लागली. त्यामुळे उशिराने समजल्याने आगीवर वेळीच नियंत्रण आणण्यात अडथळा निर्माण झाला होता.  (Belgaum)

हेही वाचलतं का?

Back to top button