निमित्त मिळाले… आता खा बिनधास्त…पाणीपुरी आरोग्यासाठी चांगली! | पुढारी

निमित्त मिळाले... आता खा बिनधास्त...पाणीपुरी आरोग्यासाठी चांगली!

नवी दिल्ली : रोज तेच तेच खाऊन कंटाळलेल्या लोकांना कधी कधी चटक मटक खाण्याची इच्छा होतेच. अशा पदार्थांमध्ये ‘पाणीपुरी’ हा तमाम भारतीयांचा एक आवडता पदार्थ आहे. महाराष्ट्रात तर पाणीपुरी न आवडणारा माणूस शोधूनही सापडणार नाही असे आपण बिनधास्त म्हणू शकतो! अशी चटपटीत पाणीपुरी आरोग्यासाठीही हितकारकच आहे असे म्हटल्यावर तमाम पाणीपुरीप्रेमींना हे एक चांगले निमित्त मिळू शकते! पाणीपुरी खाण्याचे शरीरासाठी बरेच फायदे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी खाणे लाभदायक ठरते. सहा पाणीपुरींची फक्त एक प्लेट त्यासाठी मदत करू शकते. याचे कारण म्हणजे पाणीपुरीचे पाणी. हे पाणी मसालेदार आणि चटपटीत असते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी व आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची मदत होते. पाणीपुरीचे पाणी तयार करण्यासाठी आंबट आणि तिखट मसाल्यांचा वापर केला जातो. तोंड आले असेल तर म्हणजेच माऊथ अल्सरमध्ये हे मसाले रामबाण उपाय ठरू शकतात.

कधी कधी कारण नसतानाही मळमळ जाणवते किंवा चिडचिड, मूड स्विंगची तक्रार निर्माण होते. ही समस्या दीर्घकाळ राहिली तर नॉशिया किंवा शिसारी येऊन काहीही न खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी पाणीपुरीची मदत होऊ शकते. अनेक डाएटिशियन म्हणजेच आहारतज्ज्ञ घरी तयार केलेली पाणीपुरी खाण्याचा सल्ला देतात. गव्हाच्या पुर्‍या तसेच पुदिना, जिरे आणि हिंग वापरून केलेले पाणी लाभदायक ठरते. असे पाणी पचनसंस्थेलाही लाभदायक असते. मात्र, वजन नियंत्रित करण्यासाठी गोड चटणी खाणे टाळावे असा सल्ला दिला जातो!

Back to top button