Latest

कराड : आंधळ दळतयं अन् ‘टेंडर’ पीठ खातंय!

अनुराधा कोरवी

कराड : पुढारी वृत्तसेवा: सातारा येथील कराड नगरपालिकेत आंधळा कारभार सुरू आहे. 'आम्ही दोघे भाऊ-भाऊ', 'सगळे मिळून खाऊ, आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय', 'तुझे माझे जमेना अन् तुझ्या वाचून करमेना', 'सत्तेसाठी काहीही' ही सर्व विशेषणे कराड नरगपालिकेच्या कारभाराला तंतोतंत लागू पडतात.

आघाडी – बिघाडीचे राजकारण १९९६ सालापासून सुरू झाल्यानंतर कराड शहरात गेल्या २५ वर्षात सत्तेचा जो बट्याबोळ होऊन बसला आहे, त्या सर्वाचे प्रमुख कारण म्हणजे 'टेंडर'. टेंडरसाठी नगरसेवक आणि नगरसेवक झाल्यावर पुन्हा टेंडर वाटप, अशी जणुकाही साखळी गेल्या काही वर्षापासून कराडात सुरू आहे.

सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? भ्रष्टाचारी कोण? आणि स्वच्छ कोण? याचं कोडे आजअखेर कोणालाही उलगडलं नाही. गेल्या पाच वर्षात तर 'टेंडरराज'ने कळसच गाठला आहे.

साडेचार वर्षापूर्वी थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांचे तत्कालीन प्रायोजक डॉ. अतुल भोसले होते. अतुल भोसलेंचे तत्कालीन मार्गदर्शक शेखर चरेगावकर आणि त्याच्या भाजपा पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी या निवडणुकीसाठी एकत्र येऊन थेट जनतेतून रोहिणी शिंदेंना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले.

त्यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सत्ता असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्टाईलने सर्व समीकरणे पेरून ती यशस्वी केली. जातीय रंग निर्माण झाल्यामुळे भाजपाला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यश मिळाले खरे, मात्र, बहुमत गाठता आले नाही.

ज्यांना बहुमत दिले त्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती आघाडीतील सत्ता हव्यासू नेत्यांना निवडणुकीनंतर पृथ्वीराज चव्हाण नकोसे झाले आणि त्यांनी निकालाच्या आठव्या दिवशीच आ. चव्हाण यांच्यापासून फारकत घेतली.

अधिक वाचा

जयवंतराव पाटील, राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वखाली यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडी कराडात बहुमताचा कारभार पाहू लागले. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असल्यामुळे या आघाडीने सुरूवातीचे काही दिवस भाजपाच्या नगराध्यक्षांबरोबर जुळवून घेतले.

सुरूवातीच्या काळात नगराध्यक्षांनी भाजपच्या नगरसेवकांना किंमत दिली नाही. त्या जनशक्ती आघाडीला सतत गोंजरत राहिल्या. पुढे राजकीय ध्रुवीकरण झाल्यानंतर आणि राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर गेल्या दिड वर्षात नगराध्यक्षांनी पुन्हा भाजपाच्या नगरसेवकांना गोंजरायला सुरूवात करून कसाबसा कारभार सुरू आहे.

मधल्या दिड वर्षात जयवंतराव पाटील आणि राजेंद्रसिंह यादव यांच्यात राजकीय वितुष्ट आले. ते कशावरून आले? हे सगळ्या कराडकरांना माहिती आहे. सिंह तेव्हा कोयनानगरच्या गुहेत निवांत बसून जयवंतराव पाटील यांच्याकडे कारभार सोपावून अधुनमधून कराडला येत होते. सिंहांचा कराडमधील वट कमी झाला आणि तोवर जयवंतराव पाटील यांनी संपूर्ण नगरपालिका हायजॅक केली.

तेव्हा सिंहाला आपली चूक कळून आली आणि मग ते गेल्या काही महिन्यापासून पाचपटीने आक्रमक झाले. यादव आक्रमक झाल्यामुळे ३० वर्षापासून नगरपालिकेच्या राजकारणातील रेघ आणि रेघ माहित असणार्‍या जयवंत पाटील यांनी नगराध्यक्षांना हाताशी धरून राजेंद्रसिंह यादवांना चेक दिला.

अधिक वाचा 

मध्यंतरी जयवंतराव पाटील यांना उपाध्यक्षपदावरुन हटवण्याचा विचार 'सिंहां'च्या मनात आला होता. मात्र, जनशक्ती आघाडीतील बलाबलाचा विचार करता आणि परत आपले त्यांच्याशी जुळू शकते हा विचार करून यादवांनी जयवंत पाटील यांना 'बाय' दिली होती.

या सर्व घडामोडीत गेल्या सहा महिन्यापासून सावध झालेल्या नगराध्यक्षांनी सत्ताधारी-विरोधकांतील दुहीचा चांगलाच फायदा घेतला.

रोहिणी शिंदे या खरे तर डॉ. अतुल भोसले यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. विधानसभा निवडणुकीनंतर अतुल भोसले यांना कराड शहरात मिळालेली अत्यल्प मते आणि भाजप कार्यकर्ते, नगरसेवकांनी मनापासून काम न केल्याचा ट्रस्टवर आढावा घेण्यात आला.

त्यानंतर रोहिणी शिंदे यांना डॉ. अतुल भोसले यांनी थोडे दूरच ठेवले होते. त्यानंतरच्या काळात रोहिणी शिंदे यांनी कधी शेखर चरेगावकर यांचा गुरूमंत्र होत तर कधी विनायक पावसकर गटाशी जुळवून घेऊन आपली सत्ता कशी शाबुत राहिल हेच पाहिले होते.

यादवांशी झालेल्या मतभेदानंतर जयवंतराव पाटील यांची ताकद आणि पालिकेच्या राजकारणात टेंडरसहित सर्व विषयावर जयवंतराव पाटीलांचा सल्ला याचा रोहिणी शिंदे यांनी पुरेपुर वापर करून घेतला.

विरोधकांमधील भांडणे आपल्या पथ्यावर कशी पडतील? हा विचार करून नगराध्यक्षांनी घडवलेल्या सर्व घडामोडींमुळे नगरपालिका राजकारणाचा अड्डा बनली आहे.

भाजपच्या सर्व नेत्यांना कराड पालिकेत भाजपचा नगराध्यक्षा आहे, हे सांगायला आनंद वाटतो. मात्र, राज्यातील राहु दे कराडातील कोणत्याही भाजपाच्या नेत्याला आजपर्यंत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या मदतीला यावे असे वाटलेले नाही किंबहुना त्यांनी कराड पालिकेच्या कारभारकडे दुर्लक्षच केले आहे.

सत्ताधारी जनशक्ती विकास आघाडी सूचना, उपसूचना, बहुमत, एकमत याचा खेळ करत आम्ही किती हुशार आहे हे दाखवत राहिली. पण या सर्व प्रकरणात कराड नगराध्यक्षा आणि बहुमतवाले सत्ताधारी बदनाम होत गेले.

रोहिणी शिंदे यांना सल्ला द्यायला किंवा त्यांची उघडपणे बाजू घेण्यासाठी ना डॉ. अतुल भोसले कधी पुढे आले आहेत, ना चरेगावकरांनी एखादी पत्रकार परिषद घेतली आहे.

विक्रम पावसकर कराड पालिकेत फिरकतही नाहीत. अधून- मधून विनायक पावसकर भाजपचा गड लढविण्याचा प्रयत्न करतात, मात्र, विनायक पावसकर यांना भाजपाचे म्हणून कराडकर कधीच मानत नाहीत.

अधिक वाचा 

विनायक पावसकर यांच्या कामाची पद्धत सर्वांना माहित आहे. हिंदु एकता आंदोलनाच्या माध्यमातून गेली चार दशके राजकारण करणार्‍या विनायक पावसकर यांना चुकीचे दिसत असूनसुद्धा किंवा राजकारण म्हणून रोहिणी शिंदे यांची बाजू घेण्याची वेळ आली आहे.

पावसकरांच्या हिंदुत्वाबाबत आणि त्यांच्या कामाकाजाबाबत सोमवार आणि शुक्रवार पेठेत मोठा आदर आहे. मात्र, त्यांनी चुकीच्या व्यक्तींची घेतलेली बाजू कोणालाच पटलेली नाही.

सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण?

सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? असा कराडकरांना अनेकदा प्रश्न पडतो. विनायक पावसकर कधी रोहिणी शिंदे यांच्या विरोधात बोलतात तर कधी त्यांचे कौतुक करतात.

बहुमत असणार्‍या जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव वेळेप्रमाणे आणि सोयीनुसार राजकारण करतात. गेल्या तीन वर्षात स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कराड शहरात झालेले काम सोडले, तर ना नगराध्यक्षांनी कोणतीही विधायक कामे आणली, ना बहुमत प्राप्त जनशक्तीने कोणतेही वेगळे काम आणले आहे.

कराड पालिकेची आर्थिक ताकद मोठी आहे. बँकेत फिक्स डिपॉझिट असणारी राज्यातील ही एकमेव पालिका असावी. (हे श्रेय दिवंगत नगराध्यक्ष पी.डी. पाटील यांचे आहे.) कर रुपाने पालिकेला मोठा निधी मिळतो.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून मोठा निधी पालिकेला तीन वर्षात मिळाला आहे. कोणीही चलाख व्यक्ती सत्तेत बसली तर कराड शहर चांगल्या पद्धतीने चालवू शकते. कराड पालिका म्हणजे, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.

हे अंडे प्रत्येक टेंडरमध्ये लपलेले असते. ते उबवून बाहेर काढण्यासाठी ठेकेदाराला कसे कोंडीत पकडायचे? कोणाला टेंडर द्यायचे? कुणाला अर्ज करायला सांगायचे? हे पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांना चांगलेच ठाऊक आहे. यांची कराडकर चवीने चर्चा करतात.

अधिक वाचा 

या अंड्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून संघर्ष टोकाला गेला आहे. सर्वांना चार महिन्यानंतर होणार्‍या निवडणुकीचे पडले आहे. अर्थसंकल्प रखडणे, सही झाली नाही म्हणून टेंडर न निघणे, हा खेळ सुरू होताच.

एकमेकांना बदनाम करण्याचा खेळ सुरु

आता पुढचा खेळ एकमेकांना बदनाम करण्याचा सुरू झाला आहे. नगराध्यक्षांचे पती उमेश शिंदे यांनी बेकायदेशीररित्या फलक लावला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कोणी दाखल केला?, कोणत्या दबावाखाली झाला?, कशासाठी झाला? हे सर्वांना माहिती आहे. सतत नगराध्यक्ष पत्नींच्या केबिनमध्ये बसून राहणार्‍या उमेश शिंदे यांनी बेकायदेशीरपणे फलक लावून मोठी चूकच केली आहे. त्यांच्या चुकीचे समर्थन कोणीच करणार नाही.

मात्र गेल्या दिड वर्षात जनशक्ती आघाडीचे नेते, नगरसेवक, उपनेते, गल्लीतील नेते तसेच अधुनमधून लोकशाही आघाडीच्या भावी नगरसेवकांचे अनेक ठिकाणी बेकायदेशीर फ्लेक्स लागले होते.

त्यावेळी मुख्याधिकारी झोपले होते की, नगराध्यक्षा झोपल्या होत्या. उपनगराध्यक्षांनी त्यावेळी झोपेचे सोंग घेतले होते की, जनशक्तीचे गट नेते कोयनानगरमध्ये निवांत पहुडले होते, हे सर्व कराडच्या जनतेला चांगलेच माहित आहे.

चार महिन्यानंतर येणार्‍या निवडणुकीसाठी कोणाला तरी खूष करण्यासाठी किंवा 'आर्थिक' गट बांधणीसाठी जो बट्ट्याबोळ सुरू आहे, त्याची फारमोठी किंमत भाजप, यशवंत जनशक्ती आघाडी, जयवंतराव पाटील गट या सर्वांना येणार्‍या निवडणुकीत मोजावी लागणार आहे.

कराडची जनता अधुनमधून पालिकेत डोकावणार्‍या पृथ्वीराज चव्हाण गटाला, 'थांबा आणि पहा' असं राजकारण करणार्‍या लोकशाही आघाडीला तसेच कराडमध्ये पार्टटाईम लक्ष घालणार्‍या डॉ. अतुल भोसले यांच्या गटाला धडा शिकवण्याच्या प्रतिक्षेत आहे.  कारण 'ये पब्लिक है, सब जानती है.'

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT