हिर्‍याच्या आत ८० कोटी वर्षांपूर्वींचा आणखी एक हिरा!

हिर्‍याच्या आत ८० कोटी वर्षांपूर्वींचा आणखी एक हिरा!

मॉस्को : रशियामध्ये एका असामान्य हिर्‍याच्या आत आणखी एक हिरा अडकल्याचे दिसून आले आहे. हा दुसरा हिरा सुमारे 80 कोटी वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जात आहे. या हिर्‍याला 'मत्रयोश्का' असे नाव देण्यात आले आहे. हा हिरा 'मत्रयोश्का' नावाच्या रशियन बाहुलीसारखा असल्याने हे नाव दिले आहे. अशा प्रकारच्या बाहुल्यांमध्ये घटत्या क्रमाने आत आणखी काही बाहुल्या ठेवलेल्या असतात.

हा आश्चर्यकारक हिरा कसा निर्माण झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र जगभरातील हिर्‍यांच्या खाणकामाच्या इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. रशियातील हिरे तज्ज्ञ ओलेग कोवलचुक यांनी सांगितले की, जगातील खनन इतिहासात अशा प्रकारचा अन्यहिरा नाही. हा अतिशय खास असा हिरा आहे.

निसर्गाला एखादी जागा रिकामी राहणे पसंत नसावे. त्यामुळेच एका खनिजाची जागा दुसरे खनिज घेते. या असामान्य हिर्‍याची किंमत किती आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा हिरा एका कंपनीच्या याकूतिया येथील नयूर्बा खाणीतून बाहेर काढण्यात आला होता. त्याची संरचना अतिशय गुंतागुंतीची आहे. बाहेरच्या हिर्‍याचे वजन केवळ 0.62 कॅरेट आहे.

दुसर्‍या हिर्‍याचे वजन सुमारे 0.02 कॅरेट आहे. हा आतील अडकलेला हिरा सपाट आहे. मूळ हिर्‍याच्या तपासणीवेळी त्यामधील या दुसर्‍या हिर्‍याचा छडा लागला. आता या हिर्‍याची एक्स-रे व अन्य प्रकारे तपासणी केली जात आहे. संशोधकांना वाटते की, आत अडकलेल्या हिर्‍याचा आधी विकास झाला होता व त्याच्यावर या दुसर्‍या हिर्‍याचे बाह्य आवरण निर्माण झाले असावे. या दोन्ही हिर्‍यांमध्ये हवा राहील इतके अंतर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news