धुळे पुढारी वृत्तसेवा : ड्रॅगन फ्रूट (कलम) हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपूर्ण फळ आहे. या फळाच्या लागवडीसाठी पात्र शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान तीन वर्षांत मिळू शकते. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
ड्रॅगन फ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषकतत्व आणि ॲन्टी ऑक्सिडंटमुळे या फळास सुपर फ्रूट म्हणून प्रसिध्दी मिळत आहे. या फळात विविध औषधी गुण आहेत. या व्यतिरीक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शियम या सारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली, तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. तसेच या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.
भारतीय बाजारपेठेत या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यात क्षमता, औषधी व पोषक मूल्य आदी बाबी लक्षात घेवून 2021-2022 या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. ड्रॅगन फ्रूट फळ पिकाची लागवड करण्यासाठी पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मीटर अंतरावर खड्डे खोदून खड्याच्या मधोमध सिमेंट काँक्रिटचा किमान 6 फूट उंचीचा खांब व त्यावर काँक्रिटची फ्रेम बसवावी. सिमेंट काँक्रिट खांबाच्या एक बाजूला एक या प्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.
ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी लागवड साहित्य, आधार पध्दत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण बाबींकरीता अनुदान देय आहे. याकरीता रक्कम चार लाख रुपये प्रकल्प मूल्य ग्राह्य धरुन 40 टक्के प्रमाणे रक्कम 1 लाख 60 हजार रुपये अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देय आहे. दुसऱ्या वर्षी 75 टक्के, तर तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जीवंत असणे अनिवार्य राहील.
ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.