सिया मारणे
मुंबई : नवीन वर्षातला फेब्रुवारी महिनाही संपत आलाय. 2026 मध्ये फिटनेसवर लक्ष केंद्रीत करायचा असा संकल्प करणाऱ्यांसमोर पुढे काय असा प्रश्न पडला असेल. चालायचं, जिमला जायचं की नाही अशी असंख्य प्रश्न पडलीयेत. थिंक बँक या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत फिटनेस तज्ज्ञ शैलेश परुळेकर यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. चला जाणून घेऊया…
चालण्याने वजन कमी होते का?
व्यायामाचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे ‘चालणे’. चालून वजन कमी करता येते का? हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्याला पडतोच आणि त्याचं उत्तर शैलेश परुळेकर देत म्हणाले की, हो शंभर टक्के चालून वजन कमी करता येते. पण त्या बरोबरच तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काय आहार घेता, व्यायामाव्यतिरिक्त किती आरोग्यदायी जीवन जगता यालाही तेवढेच महत्त्व आहे.
वेळ नाही हे कारण पटते का?
व्यायाम करायचा असेल तर व्यायामाची सुरुवात ही आपण आपल्याला कोणती फिजिकल अॅक्टीव्हिटी आवडते ते ठरवा आणि त्यापासून सुरूवात करा. या सगळ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे वेळेचे नियोजन. आपल्या दिनचर्येमध्ये व्यायाम कधी करायचा हे ठरले पाहिजे. जसं आपण सकाळी उठल्यावर ब्रश करतो तसेच व्यायामाचीही वेळ निश्चित केली पाहिजे. सुरूवातीला खुप मोठं ध्येय ठेवायचं नाही, सुरूवातीला आठवड्यातील दोन ते तीन दिवस व्यायाम करावा.
आठवड्याला 150 मिनिटेही व्यायामाला नसेल तर मग नियोजन चुकीचे
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमाणित वेळेनुसार आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम करावा. जर इतकाही वेळ आपण काढू शकलो नाही म्हणजे आपल्या वेळेच्या नियोजनात नक्कीच काहीतरी गडबड आहे असे समजावे. वेळेचे नियोजन हे अत्यंत गरजेचे आहे. व्यायामाची सुरूवात ही चालण्यापासून किंवा सायकल चालवणे अथवा योग करण्यापासून करावी.
Movement is Medicine असे म्हणत त्यांनी दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींचं महत्त्वही अधोरेखित केले. बुद्धिबळपटूही दररोज व्यायम करतात, असंही त्यांनी आवर्जून सांगितले.
जिम जॉइन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
आजच्या काळात सगळ्याच जिम चांगल्या आहेत. फक्त सप्लिमेंटपासून दूर राहा. जर कोणी गेल्या गेल्या तुमच्या हातात लगेच वजन कमी अथवा वाढवण्यासाठी पॉवडरचा डबा देत असेल तर ते टाळा.
चांगला जिम ट्रेनर कसा असावा?
जिम ट्रेनर ने तुम्हाला तुमचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतला पाहिजे. समजा त्याने विचारला नसेल तर तुम्ही स्वत:हून त्याच्यासोबत ही माहिती शेअर केली पाहिजे. कारण याआधारेच तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करायचा हे ट्रेनर ठरवतो .
झोपेचा आणि व्यायामाचा काय संबंध?
झोपेत शरीराची झीज भरून येत असते. झोप म्हणजे विश्रांती आणि रिकव्हरी. अपेक्षित झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी तुमची शरीरातील ऊर्जा कमी होते. साधारणपणे रिकव्हर होण्यासाठी 48 तास लागतात.
मग दररोज व्यायाम करु नये का?
दररोज व्यायाम करु नये असे नाही. फक्त रोज वेगवेगळा व्याायाम करावा. त्यामुळे ज्या स्नायूंवर व्यायामामुळे ताण आलेला असतो त्यांना विश्रांती मिळते.
सर्किट ट्रेनिंगमध्ये म्हणजे काय?
कमी वेळेत चांगला व्यायाम करण्यासाठी सर्किट ट्रेनिंग हा उत्तम पर्याय आहे. सर्किट ट्रेनिंग हे वेगवेगळ्या पद्धतीचे असते. सायकलिंग, धावणे, टेनिस, पोहणे असे प्रकार त्यात येतात. यामुळे शरीराचा वरचा भाग आणि कमरेखालचा भाग या दोन्ही व्यायाम होतो. व्यायामात समतोल साधणे हे कधीही महत्त्वाचे.
फक्त व्यायाम केल्याने वजन कमी होते का?
जगातल्या कुठल्याच व्यायामाने वजन कमी होत नाही. आपल्या कॅलरीज कुठे खर्च होतात, आपण घरी गेल्यावर काय खातो यावर हे अवलंबून असतं. आपलं वजन का वाढतं? तर आपल्या जास्तीच्या कॅलरीजचं रुपांतर चरबीत होते. तर वजन कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या कॅलरिज डेफिसिट (कमी) करायच्या. व्यायाम करताना आपल्या कॅलरीज बर्न होतात, मग घरी गेल्यावर आपण आपल्या आहारातील साखर, मैदा आणि अतिरिक्त मीठ कमी करायचं. एवढं केलं तरी उत्तम रिझल्ट्स आपल्याला मिळतात. खाण्याच्या नियमित वेळा ठरल्या पाहिजेत. सायकल आणि चालण्यासोबत वेट ट्रेनिंग ही केलं पाहिजे. व्यायामाव्यतिरिक्त २२ तासात तुम्ही कायकरता हे ही महत्त्वाचे आहे.
ऑनलाईन व्हिडिओ बघून व्यायाम करावा का?
युट्यूबवर व्हिडिओ बघून व्यायाम शक्यतो टाळावा. हे सगळं कोव्हिड नंतर जास्त चालू झालं आहे. बघून करायला गेलं तर गडबड होऊ शकते आणि दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन व्यायाम हा टाळावा.
2026 मध्ये सुदृढ शरीरसाठी काय करावं?
दोन गोष्टी करता येतील.
1. वेळेचे नियोजन : वेळ काढा, तुमची आठ तासांची झोप पूर्ण होतीये का नाही हे बघा. जर तुमचं खुप दिनक्रम खूप व्यग्र असेल तर सकाळी व्यायाम करा. तुम्ही सकाळी लवकरत उठता की रात्री उशिरा झोपता यावर सर्व अवलंबून आहे.
2. छोट्या छोट्या पावलांनी सुरूवात करा. उदाहरणार्थ, आधी सायकल चालवा किंवा चालायला सुरूवात करा.