पुणे जिल्हा बॅंक निवडणूक : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानेच केला हवेलीतील नेत्यांचा गेम | पुढारी

पुणे जिल्हा बॅंक निवडणूक : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानेच केला हवेलीतील नेत्यांचा गेम

लोणी काळभोर, पुढारी ऑनलाईन : सिताराम लांडगे जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीच्याच सहकार महर्षीचा करेक्ट कार्यक्रम करून मावळच्या लोकसभेतील पराभवाचा  वचपा हवेलीत काढला तर बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा संभाळण्याच्या तयारीने उतरलेल्यांचा जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी पत्ता कट केला अशी चर्चा सध्या सुरू आहे. (पुणे जिल्हा बॅंक निवडणूक)

जिल्हा बॅकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राष्ट्रवादीची अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे, तर भविष्यात राष्ट्रवादीला स्वत:च्याच पक्षात गटबाजीचे ग्रहण रोखणे आव्हानात्मक काम आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या अधिकृत ऊमेदवारांच्या पराभवाचे विश्लेषण जिल्ह्यात सुरू आहे ‘क’ वर्ग मतदार संघातील पराभव पक्षाच्याअत्यंत जिव्हारी लागला आहे.

या पराभवाची राज्यात जोरदार चर्चा झाली. हवेली तालुक्यातील ‘अ ‘वर्ग मतदार संघातील लढत ही मैत्रीपूर्ण झाली पक्षाचा अधिकृत उमेदवार न देण्याच्या खेळी मागे मावळ लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवारांच्या पराभवाचे कारण असल्याची चर्चा हवेली तालुक्यासह पुणे जिल्ह्यात सुरु आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मध्ये शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि अजित पवारांचे पुत्र राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात लढत होऊन बारणे हे मोठ्या मताच्या फरकाने विजयी झाले होते. बँकेच्या  निवडणुकीत हवेलीत पराभूत झालेले प्रकाश म्हस्के यांचे श्रीरंग बारणे हे दाजी असल्याने पार्थ पवारांच्या पराभवाचा वचपा अजित पवार यांनी हवेलीत काढल्याची चर्चा हवेली तालुक्यात जोरदार सुरू आहे. (पुणे जिल्हा बॅंक निवडणूक)

‘क’ वर्ग मतदार संघातील पक्षाचे अधिकृत उमेदवार हे सुरेश घुले हे सुद्धा हवेलीतील आहेत. ते बॅंकेच्या अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार होते व त्यांनाच अध्यक्ष करण्याचे ठरवुन पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्व पैकी एका अति महत्वाच्या नेतृत्वाने त्यांना निवडणूक रिंगणात उतरविले असल्याची चर्चा होती, त्यामुळे त्यांचा ही गेम ठरवून दुसऱ्या अतिमहत्त्वाच्या नेत्याने केला.

या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मतदार हे ८३७ पैकी ६०० पेक्षा अधिक होते सहजच घुले निवडुन येतील अशी परिस्थिती असताना भाजपचे प्रदिप कंद यांनी त्यांचा १४ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्याच बालेकील्ल्यात कंदाना आघाडी मिळाली तर खुद्द बारामतीत मिळालेली लक्षणीय ५२ मते नेमके काय सांगतात हे अजून गुलदस्त्यात आहे.

वेल्हे तालुक्यात तर कमालच झाली केवळ दोनच मते तेथे होती ती ही फक्त राष्ट्रवादीची होती त्यापैकी एक जण जिल्हा परिषदेचा सदस्य व माजी पदाधिकारी होता, तर दुसरा मतदार हा सुरेश घुले यांचा मतदान प्रतिनिधी (पोलींग एजंट) होता तरीही ही दोन्हीच्या दोन्ही मतदान ही प्रदिप कंद यांना मिळाली दिवसभर मतदान प्रतिनिधी म्हणून बुथवर बसून मतदान मात्र भाजपाच्या कंदाना दिले तर एका तालुक्यात जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या तालुक्यात २६ मतदार एकगट्टा एका ओळीत घेऊन आले.

तरीही आणलेल्या २६ जणांपैकी १२ जणांनी कंदाना मतदान केले या व्यतिरिक्त जिल्ह्यात पक्षाच्या बालेकिल्ल्यात भाजपाला अधिक मतदान मिळत असेल तर अध्यक्ष पदाच्या दावेदाराचेच पत्ते जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी कट केल्याचे निष्पन्न झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाच्या उमेदवाराला पुरवलेली रसद म्हणजे भविष्यात प्रत्येक तालुक्यात मोठ्या गटबाजीचे निमंत्रण आहे, याचा अधिक फायदा भाजपाला मिळणार हे सांगायची गरज नाही. त्यामुळे गटबाजीचे लागलेले ग्रहण लवकर शमणार नाही हे नक्की झाले आहे.

Back to top button