पुणे : लाखो रुपयांचा गुटखा वाहतूक करणारा ट्रक हडपसर पोलिसांकडून जप्त | पुढारी

पुणे : लाखो रुपयांचा गुटखा वाहतूक करणारा ट्रक हडपसर पोलिसांकडून जप्त

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

बेकायदेशीररीत्या लाखो रुपयांचा गुटखा वाहतूक करणारा ट्रक हडपसर पोलिसांनी जप्त करत ट्रक चालकाला अटक केली. मागील काही महिन्यांपूर्वी धडाकेबाज कारवाया करून पुणे पोलिसांनी परराज्यात जाऊन शेकडो रुपयांचा गुटखाही जप्त केला होता. परंतु, कारवाया थंड होताच गुटखा माफिया आणि दलाल पुन्हा सक्रिय झाले होते. त्‍यामुळे पोलिसांनी पुन्हा कारवाईचा धडका लावत लाखो रूपयांचा गुटखा जप्त केला.

सामीउल्लाह मुर्तजा हुसैन (वय, 51 रा. फाईल टिंकर कॉर्पोरेशन मुस्तफा बाजास एसएस मार्ग मुंबई. मुळगाव मुर्तजा ग्राम मुडीलाकला पोस्ट लोहरसन संत कबीर नगर उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

रविवारी (दि.9) रोजी पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना एक ट्रक चालक बेकायदेशीररीत्या आयशर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. तो गुटखा त्याने निपाणी व विजापूर येथून सोलापूर मार्गाने पुण्यात आणला असून, तो फुरसुंगी येथील एका गोडावून मध्ये जाणार असल्याचेही कळले. शिंदे यांनी लागलीच याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांना याबाबतची माहिती दिली.

अविनाश शिंदे, अमंलदार शाहिद शेख, प्रशांत टोणपे, गव्हाणे, खरात यांनी सापळा रचला. त्यानंतर सोलापूर रोडवरील 15 नंबर चौकाजवळ संशयित ट्रकला थांबवून ट्रक टेकवडे पेट्रोल पंपाच्या आत नेण्यात आला. ट्रक वरील चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सामीउल्लाह असल्याचे सांगितले. त्याच्याकडे ट्रकमधे काय आहे याबाबत चौकशी केली असता, त्याने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये हिरा पान मसाला गुटखा असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्‍यावर त्याने हा गुटखा निपाणी येथून सोलापूर मार्गे आणल्याचे सांगितले. गुटखा फुरसुंगी येथील गोदामात ठेवण्यास जात असल्याचे तो म्हणाला.

हडपसर पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क करून त्यांना या कारवाईची माहिती देण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सदाशिवराव गवते व विश्वास इगळे हे त्यांच्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. पकडण्यात आलेला गुटखा 46 लाख व त्याची वाहतूक करणारा ट्रक 25 लाख असा 71 लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला माल दुप्पट किंमतीस लोकांना विकला जात असल्याने बाजारभावाने जप्त गुटखा मालाची किंमत एक कोटी पर्यत पोहचत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

परिमंडळ 5 च्या उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास जंगले सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अमंलदार शाहिद शेख व प्रशांत टोणपे यांनी ही कारवाई केली.
शहरात टपर्‍या टपर्‍यांवर मिळतोय सर्रास गुटखा…

हडपसर सारख्या ठिकाणासह शहरातील अन्य उपनगरांमध्ये सर्रास गुटखा विक्री होत असल्याचे सध्या चित्र आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मधल्या काळात शेकडो रुपयांचा गुटखा पकडल्यानंतर गुटखा विक्रेत्यांनी धास्ती घेतली होती. परंतु, त्यांनी अलीकडील काही माहिन्यात कारवाई थंडावल्याचे पहायला मिळाल्यानंतर पुन्हा गुटखा माफिया, दलाल आणि गुटखा विक्रेते अ‍ॅक्टीव्ह झाल्याचे पहायला मिळत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. यापूर्वी हडपसर येथील फुरसुंगी परिसरातच सप्टेंबर 2020 मध्ये गुटखा वाहतूक टेम्पोवर कारवाई करत दहा लाखांचा गुटखा खंडणी विरोधी पथकाने पकडून दिला होता. यावेळी दलालासह दोघांना अटक करण्यात आली होती.

मुख्य माफिया, दलालांचे काय…

निपाणी सारख्या ठिकाणाहून ट्रकद्वारे गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला आहे. असे असले तरी शहरात गुटखा पुरवठा करणारा माफिया आणि शहरात ठिकठिकाणांवर गुटखा पोहचविणारे दलाल अ‍ॅक्टीव्ह झाले असताना त्यांना केव्हा जेरबंद होणार ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Back to top button