चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्‍पातील बफर क्षेत्रात आढळले दोन दिवसांचे नवजात अर्भक | पुढारी

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्‍पातील बफर क्षेत्रात आढळले दोन दिवसांचे नवजात अर्भक

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा

वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन मधील आगरझरी गावालगत दोन दिवसांचा नवजात अर्भक आज (शनिवार) ला सकाळच्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. वैद्यकीय विभागाच्या ताब्यात अर्भकाला देण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नवजात अर्भक जिवंत आणि तंदुरुस्त असल्‍याची माहिती मिळत आहे.

दुर्गापूर परिसराला लागून असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील आगरझरी गावालगत सविता गेडाम यांच्या घराशेजारी आज (शनिवार) सकाळच्या सुमारास दोन दिवसांचे नवजात अर्भक आढळून आले. स्थानिक नागरिकांनी सर्वप्रथम सरपंच सिंधू आत्राम यांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील यांच्या मदतीने दुर्गापूर पोलिसांना या विषयी कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्या ठिकाणी दोन दिवसांचे बाळ पडलेले होते. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी वैद्यकीय विभागाच्या स्वाधीन केले.

आगरझरी पासून ताडोबा टायगर होम स्टे नावाचे रिसॉर्ट काही अंतरावर आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रातील आगरझरी गावालगत नवजात अर्भकाला कुणी टाकले असावे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. ताडोबा अभयारण्यात पर्यटकांचे नेहमी आगमन होत असते. या ठिकाणी प्रर्यटनासाठी आलेल्या कुमारी मातेने नवजात बाळाला जन्म देऊन या परिसरात टाकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु वार्डात नवजात बाळावर उपचार सुरू आहेत. हे नवजात अर्भक तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.

Back to top button