Maharashtra corona update : 40 टक्के बेड भरल्यास त्या जिल्ह्यात लॉकडाऊन | पुढारी

Maharashtra corona update : 40 टक्के बेड भरल्यास त्या जिल्ह्यात लॉकडाऊन

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ज्या जिल्ह्यात उपलब्ध बेडपैकी 40 टक्के बेड कोरोना रुग्णांनी भरतील तेथे लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, राज्यात निर्बंध लावण्याबाबत उद्या, बुधवारी होणार्‍या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. (Maharashtra corona update)

दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्बंध लावायचे की नाहीत, याचा निर्णय घेण्यासाठी उद्या मंत्रालयात कोव्हिड कृती दल (टास्क फोर्स) आणि राज्याच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतच राज्यात निर्बंध लावायचा की नाही हे ठरेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे दिली.

Maharashtra corona update : राज्यातील रुग्णसंख्या

वाढत चालली असली, तरी सध्या एकूण रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे केवळ चार जिल्ह्यांतील असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असेल तेथे लॉकडाऊनचा विषयच येणार नाही. रुग्णालयांतील एकूण बेडपैकी 40 टक्के बेड भरले, तर त्या जिल्ह्यात लॉकडाऊन लावला जाईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शाळा सुरू ठेवायच्या की नाहीत, यावर विचारविमर्श सुरू आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंशी चर्चा केली आहे. त्यानुसार महाविद्यालयांबाबतचाही निर्णय बुधवारी अपेक्षित आहे.

Maharashtra corona update : जिल्ह्यात 0.49 टक्के बेड व्यापले

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सक्रिय रुग्णसंख्या 171 वर गेली. यापैकी 54 रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित 117 रुग्णांवर घरीच (होम आयसोलेशन) उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या 10 हजार 994 खाटांची (बेड) उपलब्धता आहे. या एकूण उपलब्ध खाटांपैकी जिल्ह्यात सध्या केवळ 0.49 टक्के इतकेच खाट रुग्णांनी व्यापले आहेत.

राज्यात सक्रिय रुग्णसंख्या 66 हजारांवर

राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवण्यावर आज (बुधवार) निर्णय मुंबईत 24 तासांत 10 हजार 606 नवे रुग्ण

मुंबईत निर्बंध लागण्याची शक्यता

राज्याचा मृत्यू दर 2.1 टक्के

देशभरात 37 हजार नवे रुग्ण

दिल्लीत वीकेंड कर्फ्यू

मुंबईत स्थिती चिंताजनक

राज्यात मंगळवारी कोरोनाचे 18 हजार 466 नवे रुग्ण आढळले. मुंबईतील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ सुरूच असून, 10 हजार 606 इतके नवे रुग्ण नोंदले गेले. ठाणे जिल्ह्यात 3 हजार 502, तर नवी मुंबईत 1 हजार 72 रुग्ण आढळले. दरम्यान, मंगळवारी

‘ओमायक्रॉन’चे नवे 75 रुग्ण आढळले.

राज्यातील साडेचार हजार रुग्णांना घरी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून वेगाने रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 66 हजारांवर पोहोचली आहे.

ओमायक्रॉन रुग्णसंख्या 75 वर

राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 653 वर पोहोचली आहे. मंगळवारी 75 नव्या रुग्णांची नोंद झाली. यातील मुंबईत सर्वाधिक 40 रुग्ण आढळले आहेत. ठाण्यात 9, पुणे मनपात 8, पनवेल 5, नागपूर आणि कोल्हापुरात प्रत्येकी 3, पिंपरी-चिंचवड 2, भिवंडी, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबई प्रत्येकी 1 असे ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. आजवर 259 ओमायक्रॉनबाधित बरे झाले आहेत.

सध्या मुंबईत सर्वाधिक 408 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत. या खालोखाल पुणे मनपा क्षेत्रात 71, पिंपरी-चिंचवडमध्ये 38, तर पुणे ग्रामीण 26, ठाण्यात 22, नवी मुंबई 10, पनवेल 16, कल्याण-डोंबिवली 7, सातारा 8, नागपूर 13, कोल्हापूर 5 असे रुग्ण आहेत.

Back to top button