मुंबई मिनी लॉकडाऊनकडे | पुढारी

मुंबई मिनी लॉकडाऊनकडे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत कोरोना संसर्गाचा कहर सुरूच असून मंगळवारी तब्बल 10 हजार 860 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातही मंगळवारी कोरोनाच्या 18 हजार 466 नव्या रुग्णांची नोंद झाली. रोजची रुग्णसंख्या 20 हजारांच्या पुढे गेल्यास मुंबईत मिनी लॉकडाऊन लागू केला जाईल, असे स्पष्ट संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्याने मुंबईचा प्रवास मिनी लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाल्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

लॉकडाऊनसाठी रोज 20 हजार रुग्ण दाखल होण्याची अट असेल तर आजचा रुग्णवाढीचा वेग पाहता मुंबई ही संख्या सहा ते सात दिवसांत गाठू शकते. अशा स्थितीत मुंबई पूर्वीसारखा अत्यंत कडक लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र चित्रपटगृहे, उद्याने आणि बाजारपेठा यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होत राहिल्यास मुंबईतही मिनी लॉकडाऊन तातडीने लागू केला जाऊ शकतो, असे महापौरांनी सांगितले. नियम पाळणे हा एकच मार्ग असल्याचे त्या म्हणाल्या.

मुंबईत आतापर्यंत तब्बल 389 इमारती सील करण्यात आल्या असून 16 कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर 0.63 टक्केवर पोहोचला आहे. मंगळवारी दिवसभरात 47 हजार 958 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात आढळणार्‍या बहुतांश रुग्णांना घरीच विलगीकरणामध्ये ठेवण्यात येत असल्यामुळे हॉस्पिटल व कोविड सेंटर मधील अवघ्या 14.7 टक्के बेडवर रुग्ण आहेत. उर्वरित बेड रिकामे आहेत.

ओमायक्रॉनचे आणखी 75 रुग्ण

राज्यात मंगळवारी आणखी 75 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णसंख्या 653 वर पोहोचली. नव्या रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक 40, ठाण्यात 9, पुणे मनपात 8, पनवेल 5, नागपूर आणि कोल्हापुरात प्रत्येकी 3, पिंपरी-चिंचवड 2, भिवंडी, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबई प्रत्येकी 1 असे ओमायक्रॉनबाधित आहेत.

आतापर्यंत 259 ओमायक्रॉनबाधित बरे झाले आहेत. सध्या मुंबईत सर्वाधिक 408 ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत. या खालोखाल पुणे मनपा क्षेत्रात 71, पिंपरी-चिंचवडमध्ये 38, तर पुणे ग्रामीण 26, ठाण्यात 22, नवी मुंबई 10, पनवेल 16, कल्याण-डोंबिवली 7, सातारा 8, नागपूर 13, कोल्हापूर 5 असे रुग्ण आहेत.

170 वर निवासी डॉक्टरांना कोरोना

दरम्यान सेन्ट्रल मार्डने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत राज्यातील सुमारे 170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे रुग्णांचा ताण अन्य निवासी डॉक्टरांवर येणार आहे. पीजी नीटची भरती प्रक्रिया वेळेत झाली असती तर हा ताण कमी झाला असता असे निवासी डॉक्टर सांगतात.

जेजे रुग्णालय 51, केईएम- 40, सायन- 35, नायर -35, कूपर 7, ठाणे- कळवा शासकीय रुग्णालय -8, धुळे शासकीय रुग्णालय -8, नागपूर आयजीएम- 1, बीजे मेडिकल पुणे- 5, मिरज शासकीय रुग्णालय- 1, लातूर शासकीय रुग्णालय-1, त्याचप्रमाणे औरंगाबाद, यवतमाळ, नागपूर जीएमसी आणि अंबेजोगाई शासकीय रुग्णालयातदेखील डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे सेन्ट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश माधव दहिफळे यांनी सांगितले.

70 आमदारही निघाले पॉझिटिव्ह; अधिवेशनाचा परिणाम?

हिवाळी अधिवेशनानंतर आठवडाभरातच राज्यातील तब्बल 13 मंत्री आणि 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला असून जवळजवळ एक तृतीयांश मंत्री कोरोनाग्रस्त झाल्याने बुधवारची राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक रद्द करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनात हे सर्व मंत्री, आमदार एकत्रच होते. शिवाय सध्या लग्नसराई असल्याने मंत्री, आमदार लग्नसमारंभाला हजेरी लावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने लोकांच्या गराड्यात राहिल्याने या सर्वांना कोरोनाचा संसर्ग झाला. तब्बल 13 मंत्री आणि 70 आमदार कोरोनाग्रस्त झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिली. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही कोरोनाबाधित मंत्र्यांचा हाच आकडा पत्रकारांना सांगितला.

परिणामी बुधवारी बोलावलेली मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आल्याचा निरोप मंत्र्यांच्या खासगी सचिवांना मंगळवारी दुपारी देण्यात आला.

आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपण कोरोनाबाधित झाल्याचे जाहीर केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह काही मंत्र्यांनी व अनेक आमदारांनी आपल्याला कोरोना झाल्याचे जाहीर केलेले नाही.

खासदार अरविंद सावंत, खासदार सुजय विखे-पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, त्यांची कन्या अंकिता पाटील, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, आमदार प्रताप सरनाईक, सागर मेघे, शेखर निकम, मदन येरावर, अतुल भातखळकर, इंद्रनील नाईक, रोहित पवार, चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), माधुरी मिसाळ, वरुण सरदेसाई आदी नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

शिंदे दुसर्‍यांदा कोरोनाग्रस्त

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांच्यानंतर आता नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली असून खासदार राजन विचारे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Back to top button