लॉकडाऊन नकोच; निर्बंध पाळू : राज्य सरकारकडे मागणी | पुढारी

लॉकडाऊन नकोच; निर्बंध पाळू : राज्य सरकारकडे मागणी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची व्यापारी, उद्योजकांकडून कडक अंमलबजावणी केली जाईल; पण कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊ नये. लॉकडाऊनचा निर्णय हा व्यापारी व उद्योगांसाठी मारक ठरेल, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांंधी यांनी राज्य सरकारकडे मांडली आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या संसर्गाची फारशी माहिती नसल्याने योग्य त्या उपाययोजना करण्यास राज्य सरकारला विलंब झाला. त्यातच केंद्र सरकारनेही लॉकडाऊन जाहीर केले. कालांतराने महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आटोक्यात न आल्याने राज्य सरकारने पहिल्या व दुसर्‍या लाटेतही लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनचा व्यापारीवर्गाला मोठा फटका बसला. आता तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंधाचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊन जाहीर करू, असा इशारा दिला आहे.

या अनुषंगाने ललित गांधी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पुणे येथे भेट घेतली. गांधी म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावर जे प्रयत्न सुरू आहेत त्याला व्यापारी व उद्योजकांचा पाठिंबा आहे. शासन जे निर्बंध घालेल, त्याचे काटेकोर पालन केले जाईल; पण कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करण्याला व्यापारी वर्गाचा पूर्णत: विरोध राहणार आहे.

व्यापार्‍यांची आचारसंहिता

कोरोनाचा सर्वाधिक फटका व्यापारी, उद्योजकांना बसल्याने तिसर्‍या लाटेत शासनाच्या निर्बंधांबरोबरच व्यापार्‍यांनी स्वत:ची आचारसंहिता तयार केली आहे. ग्राहकांना मास्कशिवाय दुकानात प्रवेश दिला जात नाही. किंबहुना मास्क नसेल तर त्यांना साहित्यही दिले जात नाही. याशिवाय गर्दी न करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक केले आहे. दुकानात काम करणार्‍या कामगारांचे लसीकरण केले आहे. ग्राहकांनी लस घेतली आहे की नाही याची माहिती घेऊनच दुकानात प्रवेश दिला जातो, असे ललित गांधी यांनी मंत्री टोपे यांना सांगितले.

शासन योजनांचा लाभ नाही

कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत लॉकडाऊनमुळे व्यापार, उद्योग पूर्णपणे ठप्प झाला होता. शासनाची देणी भागविण्याबरोबरच कामगारांचे पगार देणे शासनाने सक्तीचे केले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दुकानात माल भरण्यासाठी व्यापार्‍यांकडे पैसे नव्हते. केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजना जाहीर केली. त्यामुळे बँकांकडून काही अटींवर कर्ज मिळाले; पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. छोटे व मध्यम व्यापारी अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. तिसर्‍या लाटेची चाहूल लागली आहे. त्यामुळे शासन निर्बंधाचे पालन केले जाईल; पण लॉकडाऊनला व्यापारी वर्गाचा विरोध कायम राहणार, अशी भूमिका गांधी यांनी मांडली आहे.

लॉकडाऊन काळात व्यापार्‍यांना 3 लाख कोटींचा फटका

कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य व्यापार, उद्योग हे पूर्णपणे बंद होते. या काळात शासन देणी, बँकांची देणी, कामगार पगार व आपले कुटुंब चालविताना व्यापार्‍यांना कसरत करावी लागली. बाजारपेठ ठप्प असल्याने पैशाचे आर्थिक चक्रच मंदावले. व्यापार्‍यांचा माल पडून राहिला. लग्नसराई तसेच अनेक धार्मिक सणातील उलाढालीवर त्याचा परिणाम झाल्याने दोनवेळच्या लॉकडाऊनमुळे अंदाजे 3 लाख कोटींचा आर्थिक फटका व्यापारी वर्गाला बसल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.

कोरोना रोखण्यासाठी शासन जे निर्बंध घालेल त्याचे काटेकोर पालन केले जाईल; पण कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करण्याला व्यापारी वर्गाचा पूर्णत: विरोध राहणार आहे.
– ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

Back to top button