लसीकरण झालेल्या पर्यटकांनाच चांदोलीत प्रवेश | पुढारी

लसीकरण झालेल्या पर्यटकांनाच चांदोलीत प्रवेश

वारणावती, पुढारी वृत्तसेवा

कोरोना व ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस न घेतलेल्या पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. केवळ दोन डोसचे लसीकरण झालेल्या पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती चांदोलीचे वन क्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली.

याबाबत बोलताना वन क्षेत्रपाल नलवडे म्हणाले, चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या कोरोना व ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होऊ लागल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चांदोली राष्ट्रीय उद्यानास भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर ज्या पर्यटकांनी कोविड १९ प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यानांच चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी प्रवेश देण्यात येईल. यासाठी प्रत्येक पर्यटकाचे लसीकरण केले असल्याच्या प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे. डोस न घेतलेल्या पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे तसेच शासन नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पर्यटकांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही वनक्षेत्रपाल नलवडे यांनी सांगितले.

लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक

चांदोलीला पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या जवळ कोवीडच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र झेरॉक्स, मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात किंवा स्क्रीनशॉटच्या स्वरूपात असणे गरजेचे आहे. तसेच ओळख पटवण्यासाठी आधार कार्डसोबत असणे गरजेचे आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button