६ इंच लांबीच्या त्या ‘परग्रहवासी’ सांगाड्याचे सत्य आहे तरी काय? | पुढारी

६ इंच लांबीच्या त्या ‘परग्रहवासी’ सांगाड्याचे सत्य आहे तरी काय?

सांगाडा परग्रहवासीचा की मानवाचा? संशोधकांना काय आढळलंय़

पुढारी ऑनलाईन डेस्क : परग्रहवासी आहेत का? ते पृथ्वीवर येतात का? या संदर्भात अनेक वेळा दावे आणि प्रतिदावे होत असतात. परग्रहवासीय किंवा एलियन्स आहेत, हा दावा बळकट करण्यासाठी एक सांगाड्याचा उल्लेख वारंवार केला जातो.

चिली येथील ला नुरिया या शहरात सापडलेल्या ६ इंच लांबीच्या आणि जवळपास माणसासारख्या दिसणारा हा सांगडा परग्रहवासियांचा आहे असा दावा अनेकांनी केला होता. पण आता यासंदर्भातील शास्त्रीय निष्कर्ष पुढे आलेले आहेत. 

चिलीमध्ये मिळाला होता सांगाडा

चिलीमध्ये २००३मध्ये ला नुरिया या गावातील एका चर्चमध्ये ऑस्कर मुनो या व्यक्तीला हा सांगडा मिळाला होता. मुनो हे ट्रिझर हंटर म्हणून प्रसिद्ध आहेत. 

हा सांगाडा एक चामडी पाकिटात, पांढऱ्या कापडात जपून ठेवण्यात आला होता. त्रिकोणाकृती डोके, छातीच्या पिंजऱ्याला फक्त १० हाडे, डोळ्यांची विचित्र रचना यामुळे हा सांगडा नेमका कुणाचा याबद्दल विविध शंकाकुशंका सुरू झाले.

परग्रहवासीयांच्या अस्तित्वावर विश्वास असणाऱ्यांनी तर हा सांगाडा म्हणजे परग्रहवासीय असल्याचा पुरावाच असे सांगण्यास सुरुवात केली. 

परग्रहवासी सांगाडा

Sirius नावाने आलेल्या एका डॉक्युमेंट्रीत तर हा परग्रवासीयांची एखादी जमात असेल असा दावा करण्यात आला होता. हा सांगाडा प्रचीन असल्याचा दावाही करण्यात आला होता.

परग्रहवासी की मनुष्य?

पण २०१२ला सर्वप्रथम प्राथमिक विश्लेषणात हा सांगाडा १९७०मधील असल्याचा शास्त्रीय निष्कर्ष काढण्यात आला. 

पण हा सांगडा नेमका कुणाचा आणि मानसासारखा दिसणारा पण फक्त ६ इंच उंची असलेला हा जीव म्हणजे नेमका काय प्रकार आहे, हे मात्र सांगितले गेले नव्हते. त्यातही भर म्हणजे या सांगड्याचा ८ टक्के डीएनए मानवाशी मिळता जुळता नव्हता, त्यामुळे गोंधळात भरच पडली. 

पण पुढे स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी आणि युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया येथील संशोधकांनी या सांगाड्यावर संशोधन करून हा सांगाडा ४० वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका बाळाचा असल्याचा निष्कर्ष काढला. 

एखाद्या प्रिमॅच्युअर बाळाचा हा सांगडा असेल असे संशोधकांना वाटते. विविध प्रकारच्या जनुकीय स्थितीमुळे या बाळाची वाढ खुंटली होती, असे संशोधकांनी सांगितले. 

स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधक गॅरी नोलान म्हणतात हे बाळ जन्मावेळी मृत होते की जिवंत हे सांगता येणे कठीण आहे. पण या बाळाचा देह काळजीपूर्वक जतन करण्यात आला होता, हे मात्र सांगता येते.

 

हेही वाचा?

Back to top button