‘नासा’च्या यानाचा सूर्याला ‘स्पर्श’! | पुढारी

‘नासा’च्या यानाचा सूर्याला ‘स्पर्श’!

वॉशिंग्टन : ‘नासा’चे अंतराळयान ‘द पार्कर सोलर प्रोब’ने प्रथमच सूर्याला ‘स्पर्श’ केला आहे. या प्रोबने आतापर्यंत मानवी आवाक्याच्या बाहेर असलेल्या सूर्याच्या वातावरणात म्हणजेच कोरोनामध्ये प्रवेश करून नवा इतिहास घडवला आहे. यापूर्वी 1976 मध्ये सूर्याच्या सर्वात जवळ जाण्याची कामगिरी ‘हेलियस 2’ या यानाने पार पाडली होती. त्यावेळी ‘हेलियस 2’ हे प्रोब सूर्याच्या पृष्ठभागापासून 26.44 दशलक्ष मैल अंतरापर्यंत जाऊन पोहोचले होते. आता पार्कर प्रोबने हा विक्रम मोठ्या फरकाने मोडला आहे. ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या बैठकीवेळी ही माहिती दिली.

पार्कर सोलर प्रोब एप्रिलमध्ये सूर्याजवळील आपल्या आठव्या फेरीत कोरोनामधून पुढे गेले होते. हे यान 28 एप्रिलला सूर्याच्या वातावरणाच्या बाह्य स्तरातून तीनवेळा गेले होते. तेथील तापमान 11 लाख अंश सेल्सिअसपर्यंत असते. यानामधील उच्च तंत्रज्ञानाच्या हिटशिल्डमुळे त्याचे इतक्या तापमानातही संरक्षण होते.

संशोधकांना या प्रोबपासून मिळालेल्या नोंदी व आकडेवारी मिळण्यासाठी अनेक महिने लागले आणि आता त्यानंतरचे अनेक महिने या घटनेची पुष्टी करण्यात गेली. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधील या प्रोजेक्टचे संशोधक नोऊर रावऊफी यांनी सांगितले की ही घटना अतिशय महत्त्वाची आहे.

हे प्रोब 2018 मध्ये पाठवण्यात आले होते. पार्करने ज्यावेळी पहिल्यांदा सौर वातावरण आणि येणार्‍या सौर वार्‍यांना पार केले होते त्यावेळी ते सूर्याच्या केंद्रापासून 1 कोटी 30 लाख किलोमीटरच्या अंतरावर होते. यावेळी त्याने कोरोनामध्ये तीनवेळा प्रवेश केला. या तिन्ही ‘डुबक्या’ सहजपणे झाल्या. मिशिगन युनिव्हर्सिटीचे जस्टीन कॅस्पर यांनी सांगितले की ज्यावेळी हे प्रोब सूर्याच्या वातावरणात पाच तास राहिले तो काळ सर्वाधिक नाट्यमय होता.

पार्कर अतिशय वेगाने जात होते आणि त्याने बराच मोठा पल्ला गाठला. या काळात त्याचा वेग शंभर किलोमीटर प्रतिसेकंद होता. सूर्याचा कोरोना अपेक्षेपेक्षाही अधिक प्रमाणात धुळीने भरलेला आहे. भविष्यात आणखी कोरोना मोहिमांमधून संशोधकांना सौरवादळांच्या उत्पत्तीला समजण्यासाठी मदत मिळेल. ही वादळे कशी उष्ण होतात आणि अंतराळात पुढे कशी जातात हे समजून घेता येईल.

Back to top button