मंगळ ग्रहाचा पहिला नकाशा नासा च्या रोव्हरने बनवला | पुढारी

मंगळ ग्रहाचा पहिला नकाशा नासा च्या रोव्हरने बनवला

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाची बाह्य तपासणी करण्याबरोबरच आता त्याच्या खोलीबाबतच्या रहस्यांमध्येही वैज्ञानिकांचे कुतुहल वाढले आहे. संशोधकांनी आता मंगळ ग्रहाचा पहिला नकाशाही तयार केला आहे. 2018 मध्ये मंगळावर उतरलेल्या ‘इनसाईट’ या रोव्हरच्या निरीक्षणांच्या आधारे हा नकाशा तयार करण्यात आला आहे. तो मंगळाच्या भूगर्भीय संरचनेशी संबंधित आहे.

इनसाईटच्या लँडरमधील एका उपकरणाची यासाठी मदत घेण्यात आली. या उपकरणाच्या सहाय्याने पृष्ठभागाच्या खालील गोष्टींचाही अभ्यास करता येऊ शकतो. स्वित्झर्लंडच्या ज्यूरिखमधील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे भूभौतिक वैज्ञानिक सेड्रिक श्मेल्जबॅक यांनी सांगितले की आम्ही यासाठी एका विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला.

तिच्या मदतीने भूकंपाची जोखीम असलेल्या ठिकाणांना निश्‍चित करणे आणि पृष्ठभागाखालील संरचनांचे अध्ययन करणे शक्य होते. हे तंत्रज्ञान ‘व्यापक कंपन’ या तत्त्वावर आधारित आहे. त्याचाच वापर मंगळ ग्रहाचा नकाशा बनवण्यासाठीही करण्यात आला आहे.

तो अद्याप प्रसिद्ध करण्यात आला नसला तरी ग्रहाच्या विकासाच्या कोट्यवधी वर्षांच्या इतिहासावर तो प्रकाश टाकू शकतो. त्यामध्ये भूगर्भातील आतापर्यंत न पाहिलेले स्तर आणि घन स्वरूपातील लाव्हाच्या जाड स्तरालाही दाखवतो. हा स्तर वरील दगड-मातीच्या दहा फूट जाडीच्या स्तराखाली आहे.

Back to top button