Aashna Lidder : योगी आदित्यनाथ यांच्यावर ट्विट केलेल्या दिवंगत ब्रिगेडियर लिड्डर यांची मुलगी का होतेय ट्रोल | पुढारी

Aashna Lidder : योगी आदित्यनाथ यांच्यावर ट्विट केलेल्या दिवंगत ब्रिगेडियर लिड्डर यांची मुलगी का होतेय ट्रोल

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : तामिळनाडूच्या कुन्नूर भागात ८ डिसेंबरला हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १२ जण शहीद झाले. यात शहीद झालेले ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिड्डर यांच्यावर १० डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी आणि १७ वर्षीय मुलगी आशना यांना अश्रू अनावर झाले. (Aashna Lidder) आशना आपल्या वडिलांच्या पार्थीवाचे दर्शन घेताना तिच्या रडण्याने पुर्ण परिसर गहिवरून गेला होता. पण काही भावनाहीन लोकांनी तिच्या जुन्या ट्वीटवरून तिला जोरदार ट्रोल केले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आशनाने एक ट्विट केले होते. या जुन्या ट्वीटवरून तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले. दरम्यान ब्रिगेडियर लिड्डर यांच्या मुलीने आपले ट्वीटर अकाऊंट बंद केले आहे.

Aashna Lidder : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हल्ल्यावरून ट्रोल

लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांना वाहनाने चिरडल्यानंतर प्रियांका गांधी यांना घटनास्थळी जाण्यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना सीतापूर येथील गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले. यावेळी प्रियंका गांधी गेस्ट हाऊस झाडून काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली होती. जनतेने त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे ठेवले आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.

आशना लिड्डरने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या याच विधानाबद्दल ट्विट केले होते. त्यांना त्यांच्या राज्यातील अशांतता सुधारण्यास सांगितले. आशना लिड्डरने ट्विटमध्ये लिहिले की, योगी आदित्यनाथ तुम्हाला विरोधकांची किंमत नाही. मला राजकारण समजते. पण सध्या सुरू असलेले राजकारण वाईट पद्धतीने सुरू आहे.

योगीजी तुमच्या राज्यातील अशांतता दूर करा

एखादी व्यक्ती झाडूने लोटत असेल आणि त्याच्यावर आपण खालच्या पातळीवर टीका करणे चुकीचे आहे. योगीजी तुमच्या राज्यात सध्या अशांतता पसरली आहे. ती दूर करा अशा आशयाचे ट्विट आशनाने केले होते.

या ट्विटमुळे सोशल मीडियावर ट्रोलर्सनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे आशनाला तिचे ट्विटर अकाउंट डिअॅक्टिव्हेट करावे लागले. पण आशनाच्या बाजूने अनेकजणांनी ट्रोलर्सना जोरदार प्रत्त्यूत्तर दिले आहे.

ट्रोलर्सना प्रत्युत्तर…

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी समर्थनात ट्विट करत ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे. आशना फक्त १७ वर्षांची आहे, ती दु: खी आहे पण मजबूत आहे, तिने नुकतेच तिच्या वडिलांचे अंतिम संस्कार केले. जे एक लष्करी अधिकारी होते, तिचे जुने ट्विट काढत तिने व्यक्त केलेल्या मतांमुळे तिला ट्रोल केले गेले. तुमच्या टीकेमुळे ती ट्विटर अकाउंट बंद करावे लागते. तुम्ही अजून किती खालच्या पातळीला राजकारण करणार असे म्हणत ट्रोलर्सना खडसावले.

भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांनी ही आशनाच्या समर्थनात ट्विट केले आहे. आम्ही दोघे भारतात राहतो. जिथे ब्रिगेडियर लिड्डरची धाडसी मुलगी हिला तिचे ट्विटर बंद करण्यास भाग पाडले जाते. भाजपविरोधी बोलल्यामुळे तिला ट्रोल करून देशद्रोही ठरवले जाते.

Back to top button