नवी दिल्ली : उत्तर भारताचा पारा घसरू लागला, दिल्लीचे तापमान ६ अंशावर | पुढारी

नवी दिल्ली : उत्तर भारताचा पारा घसरू लागला, दिल्लीचे तापमान ६ अंशावर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

राजधानी दिल्लीसह उत्तर भारताचा पारा हळूहळू घसरू लागला आहे. दिल्लीतील किमान तापमान साडेसहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत थंडीचा प्रकोप आणखी वाढण्याची शक्यता स्कायमेट हवामान संस्थेने व्यक्त केली आहे.

गत चोवीस तासांत दिल्लीतील कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ६.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पर्वतरांगातून येत असलेल्या थंड हवेमुळे राजधानीतील प्रदूषण बऱ्यापैकी कमी झाले आहे. मागील चोवीस तासात सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक २८१ इतका नोंदवला गेला.

एनसीआरमधील गाजियाबादमध्ये हा निर्देशांक २६४, नोएडामध्ये २१८ तर फरीदाबादमध्ये २२१ इतका नोंदवला गेला. १५ डिसेंबरपर्यंत हवेची गुणवत्ता आणखी सुधारण्याचा स्कायमेटचा अंदाज आहे. दरम्यान,  राजस्थानमधील चुरू येथे राज्यातले सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. याठिकाणी तापमान ३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. याशिवाय नागौर येथे ४.७ अंश सेल्सिअस, सीकर येथे ५ अंश सेल्सिअस, पिलानी येथे ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचलं का ?

Back to top button