भटकती आत्माच मोदींना सत्तेवरून खाली खेचणार : शरद पवार | पुढारी

भटकती आत्माच मोदींना सत्तेवरून खाली खेचणार : शरद पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवरून संबोधित करत असताना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बीकेसीच्या मैदानावरून पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले. पंतप्रधान मोदी यांनी माझा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला, पण हीच ‘भटकती आत्मा’ जनतेच्या पाठबळावर तुम्हाला पंतप्रधान पदावरून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र हा शहा-मोदी-अदानीचा होऊ देणार नाही असे सांगत उद्धव ठाकरे यांनी येत्या 4 जूनला देशात ‘डिमोदीनेशन’ होईल, असा दावा केला. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी वांद्रे-कुर्ला येथे इंडिया -महाविकास आघाडीची परिवर्तन सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, शिवसेना खासदार संजय राऊत, तुषार गांधी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टिकेची झोड उठवली. देशातील जनतेने गेल्या काळात अनेक निवडणूका पहिल्या. त्या निवडणूकांमधून विविध पक्षाच्या नेतृत्वानी भारताची संसदीय लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, की या निवडणूकीच्या निमित्ताने देशाची लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला दिलेले मूलभूत अधिकार कसे वाचवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज लोकशाही, संविधान, महाराष्ट्राचे हित संकटात आहे, त्यातून सुटका हवी असेल तर आपल्याला एकत्र रहायला हवे. मोदींना सत्तेपासून खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहनच पवार यांनी उपस्थितांना केले.

हुकूमशाहीचा विषाणू संपवा ः ठाकरे

उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला केला. शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र हा शहा-मोदी-अदानीचा होऊ देणार नाही. आता हुकुमशाहीचा हा विषाणू संपवा असे आवाहन त्यांनी केले. नाशिकमध्ये मोदींच्या सभेत जेव्हा एकाने कांद्यावर बोला, अशी मागणी केली तेव्हा मोदींच्या नजरेकडे बघा. एका हुकूमशाहची नजर कशी असते हे समजेल. त्यांनी कांद्यावर बोलण्याऐवजी भारत माता की जय, अशी घोषणा देत कांदा उत्पादकांच्या प्रश्नांना बगल दिली. भारतमाता म्हणजे कोण आहेत. देश म्हणजे दगडधोंडे नसतात. मात्र देश म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी आहे, मणिपूरमध्ये धिंड निघत असलेल्या महिला आहेत, असे ते म्हणाले. मुंबईत काही दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळून काही लोक मरण पावले. त्यानंतर या परिसरातील रक्तही सुकले नसताना याच परिसरात ढोल-ताशे वाजले, पंतप्रधानांनी रोड शो केला. या निमित्ताने भाजपचा उन्माद बघायला मिळाला, अशा शब्दात त्यांनी मोदींच्या रोड शोवर टीका केली.

नकली शिवसेना या टीकेला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, तुम्ही शिवसेना प्रमुखाच्या मुलाला नकली संतान म्हणता. मी तुम्हाला आव्हान देतो, या आमने सामने थेट चर्चेला. मी माझ्या सातपिढ्याची वंशावळ घेऊन येतो, तुम्हीही असल्यास तुमच्या सात पिढ्याची वंशावळ घेऊन या. तुम्ही भाडोत्री गद्दारांची फौज घेऊन उध्दव ठाकरेंना संपवायला निघालात,मात्र महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही त्यांनी मोदींवर केली.

मोदींनी देशाची वाट लावली : खर्गे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, खोटे बोलणे हीच मोदींची गॅरंटी आहे. 15 लाख रुपये देणार, दरवर्षी 2 कोटी नोकर्‍या देणार, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करु असे म्हणाले होते. पण मोदींनी यातील एकही गोष्ट पुर्ण केलेली नाही. मोदी सत्तेवर येताच महागाई गगनाला भिडली. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले. पण आज ते आपल्या भाषणात महागाईवर काहीच बोलत नाहीत. कारण खोटं बोलणं हीच त्यांची गॅरंटी आहे, अशी जोरदार टिकही खरगे यांनी केली. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षाला मोदी नकली पक्ष म्हणत त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण लक्षात ठेवा ते घाबरणारे नाहीत, ते कुणापुढे झुकणारी नाहीत, अशा इशारा देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले, असा आरोपही खरगे यांनी केला.

Back to top button