mumbai bank election : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर झाले ‘मजूर’ | पुढारी

mumbai bank election : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर झाले ‘मजूर’

मुंबई, पुढारी ऑनलाईन:  mumbai bank election : निवडणूक भल्या भल्यांना जमिनीवर आणते. ते खरेही ठरले आहे. मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर चक्क मजूर झाले आहेत. आता यातही आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण दरेकर यांनी मजूर संस्था प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे.

सहकारी बँकेमध्ये विविध प्रवर्गातून प्रतिनिधींसठी अर्ज दाखल केले जातात. मात्र, त्या प्रवर्गातील खऱ्या प्रतिनिधींऐवजी राजकारणी सोयीचा मार्ग काढून आपली पोळी भाजून घेतात. मुंबै बँकेच्या निवडणुकीत ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी मजूर संस्था प्रवर्गातून दाखल केला आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले दरेकर मजूर कसे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. याआधीच्या निवडणुकांतही ते याच प्रवर्गातूनच निवडून येत आहेत.

दरेकर यांच्या अर्जावर सहकार सुधार पॅनेलचे अंकुश जाधव, संभाजी भोसले यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे याविषयी आक्षेप नोंदवला आहे.

मजूर कुणाला म्हणावे…

मजूर सस्थांच्या उपविधीमध्ये मजुराची व्याख्या स्पष्ट केली आहे. अंगमेहनत करून उपजिवीका करणारी व्यक्ती ही मजूर संबोधली जाते. शारीरिक श्रमातून मजुरी करणारा असला पाहिजे, असेही या उपविधीत नमूद आहे. त्यामुळे अलिशान गाडी आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले प्रवीण दरेकर मजूर कसे होऊ शकतात? असा प्रश्न आक्षेतात नोंदवला आहे. मजुरीचे काम न करणाऱ्या सभासदांचे सदस्यत्व रद्द करावे, असे आदेश हायकोर्टाने याआधीच दिले आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार मतदार यादी करण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची होती. मात्र, त्यांनी तशी केली नाही, असेही आक्षेपात नोंदवले आहे.

mumbai bank election बिनविरोध होण्याची शक्यता

२ जानेवारी २०२२ रोजी बँकेची निवडणूक होणार आहे. यात भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड मैदानात उतरले आहेत. बिनविरोध निवडीसाठी प्रसाद लाड यांनी नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. प्रवीण दरेकर, आनंदराव गोळे आणि प्रसाद लाड यांनी ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे त्यात एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button