पहिल्या ‘थ्री पॅरेंटस् डिझायनर बेबी’चा जन्म! अपत्यप्राप्तीसाठी ‘आयव्हीएफ’नंतरचे सर्वात मोठे पाऊल | पुढारी

पहिल्या ‘थ्री पॅरेंटस् डिझायनर बेबी’चा जन्म! अपत्यप्राप्तीसाठी ‘आयव्हीएफ’नंतरचे सर्वात मोठे पाऊल

लंडन : ब्रिटनमध्ये दोन मातांचे स्त्रीबीज आणि पित्याच्या शुक्राणूपासून ‘थ्री पॅरेंटस् डिझायनर बेबी’चा जन्म झाला आहे. अपत्यप्राप्तीसाठी ‘आयव्हीएफ’नंतरचे हे सर्वात मोठे पाऊल असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नवजात बाळामध्ये अनुवांशिक आजारांना नष्ट करण्यासाठी डॉक्टरांनी आईच्या स्त्रीबीजातील केंद्रकातून खराब मायटोकॉन्ड्रिया (सूत्रकणिका किंवा जनूक) हटवले होते.

या प्रक्रियेत स्त्रीबीजाला रिकामे करून दात्या महिलेच्या स्त्रीबीजातील निरोगी मायटोकॉन्ड्रिया घेतले जाते आणि पित्याच्या शुक्राणूपासून या स्त्रीबीजाला फलित केले जाते. यामुळे नवजात बाळामध्ये आईपासून मिळणार्‍या अनुवांशिक आजाराचा धोका नष्ट होतो.

थ्री पॅरेंट बेबीला डॉक्टर ‘मायटोकॉन्ड्रिया डोनेशनने जन्मलेले बाळ’ म्हणत आहेत. आईच्या गर्भातील फलित स्त्रीबीजात बाळाच्या मूळ आई-वडिलांचेच डीएनए असते. त्यामुळे त्याचे जैविक माता-पिता तेच ठरतात. केवळ आईमधील अनुवंशिक आजाराशी संबंधित ‘मायटोकॉन्ड्रिया’ जनुक त्यामधून हटवले जाते.

ही संपूर्ण प्रक्रिया स्त्रीबीज फलित करण्यापूर्वी केली जाते. ब्रिटनमध्ये आता अशा ‘डिझायनर बेबी’च्या जन्मानंतर वादही सुरू झाला आहे. हा निसर्गाशी छेडछाडीचा प्रकार असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. डॉ. डेव्हिड क्लॅन्सी यांनी म्हटले आहे की काही पालक नवजात बाळाचा चेहरा, त्वचा आणि लिंगामध्येही स्वतःच्या इच्छेने बदल घडवून आणतील!

Back to top button