हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणे कळणार 30 मिनिटे आधीच; लक्झेमबर्ग विद्यापीठातील संशोधन | पुढारी

हार्ट अ‍ॅटॅकची लक्षणे कळणार 30 मिनिटे आधीच; लक्झेमबर्ग विद्यापीठातील संशोधन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था :  आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय मॉडेलद्वारे हृदयविकाराच्या धक्क्याची (हार्टअ‍ॅटॅक) लक्षणे 30 मिनिटे आधीच कळणार आहेत. एआय मॉडेल आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर संभाव्य हार्टअ‍ॅटॅकचा आगाऊ इशारा मिळणार असल्याचा दावा लक्झेमबर्ग विद्यापीठामधील संशोधकांनी केला आहे.
या मॉडेलचे नाव ‘वॉर्निंग ऑफ आर्टिएल फिब्रिलेशन’ (वॉर्न) असे ठेवण्यात आले आहे. लक्झेमबर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या एआय मॉडेलचा शोध लावला आहे.

यासंदर्भातील शोधनिबंध पॅटर्न नियतकालिकात प्रसारित झाला आहे. या संशोधनात म्हटले आहे की, एआय मॉडेलद्वारे हृदयविकाराच्या धक्क्याबाबत 80 टक्के अचूकपणे आगाऊ निदान होण्यास मदत होणार आहे. या एआय मॉडेलद्वारे हृदयाच्या ठोक्याची माहिती समजणार आहे. शिरा अथवा धमण्यांमध्ये काही गडबड झाल्यास हृदयाचे ठोके वाढून हार्टअ‍ॅटॅकचा धोका संभवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे संबंधित एआय मॉडेल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले असल्यास संबंधित व्यक्तीला धोक्याची आगाऊ सूचना मिळते. मोबाईलमधील स्मार्टवॉचमध्ये धोक्याबाबतच्या इशार्‍याची नोंद होणार आहे.

अशी घेतली चाचणी…

चीनमधील वुहान रुग्णालयातील हृदयविकाराशी संबंधित 350 रुग्णांची चाचणी करण्यात आली. या मॉडेलद्वारे या रुग्णांवर 24 तास नजर ठेवण्यात आली. त्यांच्या हृदयाच्या विविध टप्प्यांतील स्पंदनांची नोंद घेण्यात आली. ‘वॉर्न’ यंत्रणेद्वारे स्पंदनांची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करता आले. डीप लर्निंगद्वारे स्पंदने आणि हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमिततेची माहिती मिळत असल्याचा दावा लक्झेमबर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला.

Back to top button