सलमान गोळीबार प्रकरणातील दोन्ही पिस्तुले, चार मॅगझिन, सतरा जिवंत काडतुसे जप्त | पुढारी

सलमान गोळीबार प्रकरणातील दोन्ही पिस्तुले, चार मॅगझिन, सतरा जिवंत काडतुसे जप्त

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेली दोन्ही देशी बनावटीची पिस्तुले, चार मॅगझिन आणि सतरा जिवंत काडतुसे मुंबईच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी जप्त केली आहेत.

प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने दोन दिवसांपासून हाती घेतलेले तापी नदी ऑपरेशन यशस्वी झाले आहे.
सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर पळून गेलेल्या दोन्ही शूटरना गुजरातच्या भूज येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यानी अटक केली होती. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार पाल या दोघा शूटर्सनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केल्यानंतर दोन्ही पिस्तूल, मॅगझीन आणि काडतुसे सुरतला तापी नदी फेकून दिली होती. या गोळीबारातील दोन्ही पिस्तुले हस्तगत करणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते.

सोमवारी प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांचे पथक दोन्ही आरोपीसोबत सुरतला गेले होते. या पथकाने तापी नदीत पिस्तूलचा शोध सुरु केला होता. याकामी गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांसह मच्छिमारांची मदत घेतली होती.

सोमवारी रात्री एक पिस्तूल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. मंगळवारी गुन्हे शाखेने पुन्हा तापी नदीत पिस्तूलचा शोध सुरु केला आणि दुपारपर्यंत दुसरे पिस्तूल, चार मॅगझीन आणि सतरा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात यश आले.

सलमान खान गोळीबार प्रकरणात न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे दोन्ही पिस्तूलसह मॅगझीन आणि काडतुसे सापडल्याने आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. तापी नदीतून काढण्यात आलेली दोन्ही पिस्तुले, मॅगझीन आणि काडतुसे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होणार आहे.

Back to top button