उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना Z+ सुरक्षा नाकारली होती; राजू वाघमारेंचा आरोप | पुढारी

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना Z+ सुरक्षा नाकारली होती; राजू वाघमारेंचा आरोप

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सहकारी आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचा जीव धोक्यात असताना त्यांना झेड प्लस सुरक्षा का नाकारली, असा सवाल शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी आज केला. एकनाथ शिंदे यांनी मागणी करुन देखील त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारणे म्हणजे यातून त्यांचा घात करण्याची उद्धव ठाकरे यांची प्रवृत्ती दिसून येते, असा आरोप वाघमारे यांनी केला.
नगरविकास मंत्री आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हाचे पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होता, मात्र त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा का नाकारली, याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला द्यायला हवे, अशी मागणी डॉ. वाघमारे यांनी केली. स्वत:च्या पक्षातील एक ज्येष्ठ सहकारी सुरक्षेची मागणी करतो आणि कुंटुंबप्रमुख म्हणवणारे उद्धव ठाकरे ती नाकारतात याला स्वपक्षीयांसोबत केलेली गद्दारी का म्हणू नये, अशी टीका वाघमारे यांनी केली.
गद्दार म्हणून आरोप करण्यापूर्वी नकली शिवसेनेने गद्दार शब्द स्वत:शी किती निगडीत आहे, याचा विचार करावा. शिवसेनेतील झालेले बंडाची सुरुवात खूप आधीपासून झाली. त्यामुळे हे एकाच रात्रीत घडलेले नाही. या बंडाला त्यावेळचे शिवसेनेचे नेतृत्व कारणीभूत आहे, असा आरोप डॉ. वाघमारे यांनी केला. यापुढे उबाठा गटाबाबत आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा डॉ. वाघमारे यांनी दिला.
उद्धव ठाकरेंना आता पंतप्रधानपदाची लालसा
उद्धव ठाकरे यांच्या मनात आता पंतप्रधान पदाची लालसा उफाळून आली आहे. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही बाजुला सारले, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. अशावेळी ज्येष्ठ सहकाऱ्याला बाजूला सारणे आणि सत्तेची लालसा दिसून येते. उद्धव ठाकरेंची अवस्था उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी झाली आहे. नकली शिवसेनेचे मुंगेरीलाल संजय राऊत आहेत, असा टोला वाघमारे यांनी लगावला.

Back to top button