६० वर्षात झाले नाही ते दहा वर्षात करून दाखविले : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

६० वर्षात झाले नाही ते दहा वर्षात करून दाखविले : उपमुख्यमंत्री फडणवीस

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मागील ६० वर्षात जे झाले नाही, ते दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले. त्यामुळे ‘पिछले दस साल का ये तो ट्रेलर हैं, अभी पिच्चर बाकी हैं’ असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या भोकरमध्ये आज (दि.२२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महायुती भाजपचे उमेदवार प्रताप पाटील- चिखलीकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेलं इंजिन असून, त्यातील प्रत्येकजण स्वत:लाच इंजिन समजत असल्यामुळे, प्रत्येकाची वेगळी दिशा झाली आहे. याउलट महायुतीमध्ये पंतप्रधान मोदी हे एकमेव इंजिन असून त्याला आपण वेगवेगळ्या पक्षाचे डबे जोडल्यामुळे ही गाडी विकासाच्या दिशेने सुसाट धावत आहे. मोदींच्या या इंजिनला अशोक चव्हाण, गोपछडेंची बोगी यापूर्वी जोडली असून आता प्रताप पाटील -चिखलीकर यांची बोगी पुन्हा एकदा लावायची आहे. त्यामुळे नांदेडचा विकास होईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

तसेच मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. शेतक-यांना सुजलम-सुफलम करायाचे आहे, हे पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्यामुळेच शक्य आहे. यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे, असे सांगून फडणवीस यांनी गरीबांसाठी घरकुल योजना, मोफत गॅस, शौचालय, हर घर नल यासह विविध योजनांचा पाढा वाचून दाखवला. तसेच महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील- चिखलीकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी कमळ या चिन्हावरचे बटन दाबण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह स्थानिक आमदार, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button