मृतदेहाच्या अवस्थेवरून मृत्यूची अचूक वेळ सांगणारा किडा सापडला! | पुढारी

मृतदेहाच्या अवस्थेवरून मृत्यूची अचूक वेळ सांगणारा किडा सापडला!

पुणे, पुढारी वृत्तसेवा : माणसाच्या मृत्यूची वेळ किडा सांगणार, असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण, हे खरंय. पुण्याच्या झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या एका महिला शास्त्रज्ञाने या किड्याचा शोध लावला आहे. त्याला ‘मोरेश्वर किडा’ असे मराठी नाव दिले आहे. हे संशोधन न्याय वैद्यकशास्त्रासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा दावा महिला शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा कलावटे यांनी केला आहे. सध्या एखाद्या माणसाच्या मृत्यूची वेळ ठरविण्यासाठी न्याय वैद्यकशास्त्राचे अनुमान गृहीत धरले जाते.

त्यासाठी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येते. त्यानंतर विविध प्रकारच्या रासायनिक चाचण्या करून संबंधित मृतदेहाची मृत्यूची वेळ निश्चित केली जाते. मात्र, ही वेळ सांगणारा किडा पृथ्वीवर आहे अन् तोही चक्क पुणे शहराजवळील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावात आहे. ही बाब जगाला प्रथमच पुणे शहरातील झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा सुरेशचंद्र कलावटे यांनी संशोधन करून सांगितली आहे. त्यांचे हे संशोधन न्यूझीलंड येथून प्रसिद्ध होणार्‍या ‘झुटेक्सा’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये 14 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाले आहे.

मोरगावातील मयूरेश्वर मंदिराजवळ सापडलेला हा किडा ‘ट्रोगिड’ या कीटकांच्या कुटुंबातील आहे. त्यात एकूण नऊ प्रजाती आतापर्यंत जगातील शास्त्रज्ञांनी शोधल्या होत्या. हा दहावा किडा डॉ. अपर्णा यांनी जगाला शोधून दिला आहे. हा किडा अस्तित्वात असूनही त्याच्यापर्यंत कुणी पोहोचलेले नव्हते. ते संशोधन जगात प्रथम पुण्यात झाले.

दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञाचाही सहभाग

डॉ. अपर्णा कलावटे या आकुर्डी (पुणे) येथील भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्र (झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) येथे शास्त्रज्ञ आहेत. या संशोधनात त्यांना दक्षिण आफ्रिका देशातील प्रिटोरिया प्रांतातील डिट्साँग नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे संचालक वर्नर स्ट्रम्फर यांनी सहकार्य केले. या शोधनिबंधाचे ते सहलेखक आहेत.

मृतदेह खाऊन निसर्ग स्वच्छतेचे काम करतो

जमिनीत माणसाचा मृतदेह कुजून जातो व शेवटी सापळा राहतो, अशी माहिती आपल्याला आहे. मात्र, हा कुजलेला मृतदेह किडे खातात. शरीराच्या विघटनादरम्यान पहिल्यांदा आवाज करणार्‍या माशा ब्लो फ्लाईज पहिल्या टप्प्यात येतात. त्यानंतर विविध शिकारी किडे येतात, जे मोठ्या संख्येने अळ्या खातात. हे कीटक बहुतेक मऊ ऊतींचे सेवन करतात. काही कीटक त्वचा, केस, कूर्चा आणि हाडे खातात. केराटीन बिटल हे कीटक शेवटी येतात. ते त्वचेचा खूप खराब झालेला भाग खातात. त्यामुळे हा किडा न्याय वैद्यकशास्त्रास मदत करणारा ठरणार आहे. त्यामुळे मृतदेह किती काळापासून कुजलेल्या अवस्थेत आहे, याचा अंदाज बांधणे सोपे जाणार आहे.

Back to top button