CSK vs LSG : लखनौचा सुपर विजय; चेन्नई सुपर किंग्जला 8 विकेटस्नी मात | पुढारी

CSK vs LSG : लखनौचा सुपर विजय; चेन्नई सुपर किंग्जला 8 विकेटस्नी मात

लखनौ; वृत्तसंस्था : लखनौ सुपर जायंटस्ने चेन्नई सुपर किंग्जला 8 विकेटस्नी हरवून गुणतालिकेतील आपले स्थान आणखी भक्कम केले. चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदा खेळताना 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात के. एल. राहुल (82) आणि क्विंटन डीकॉक (54) यांनी रचलेल्या 134 धावांच्या पायावर लखनौने विजयी महाल बांधला.

लखनौ सुपर जायंटस्च्या गोलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्जची मजबूत फलंदाजी 176 धावांत रोखल्यावर फलंदाजांनीही आपली कामगिरी चोख पार पाडली. सलामीवीर क्विंटन डीकॉक आणि कर्णधार केे. एल. राहुल यांनी निर्धोक फलंदाजी केली; परंतु दोघांचा स्ट्राईक रेट दीडशेच्या आतच होता. राहुलने 31 चेंडूंत, तर डीकॉकने 41 चेंडूंत अर्धशतक गाठले. शेवटी 15 षटकांनंतर चेन्नईला पहिले यश मिळाले. मस्तफिजुरने डीकॉकला उसळत्या चेंडूवर धोनीकरवी बाद केले. त्याने 43 चेेंडूंत 54 धावा केल्या. यावेळी लखनौच्या 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या 30 चेंडूंत विजयासाठी 43 धावा करण्याची त्यांना आवश्यकता होती.

के. एल. राहुलच्या जोडीला निकोलस पूरन आला. या दोघांनी आपल्या पद्धतीने धावांचा रतीब सुरू केला. 17 चेेंडूंत 16 धावा असे लक्ष्य आटोक्यात आले असताना राहुल हा जडेजाच्या फ्लाईंग कॅचचा बळी ठरला. तो 53 चेंंडूंत 82 धावा करून तंबूत परतला. शेवटच्या दोन षटकांत 12 धावा करण्याची औपचारिकता पूरन आणि स्टॉयनिस यांनी एका षटकातच पूर्ण केली. पूरनने विजयी चौकार मारला. तो 23, तर स्टॉयनिस 8 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंटस्ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आज पुन्हा अजिंक्य रहाणेला सीएसकेने सलामीला पाठवले. रचिन रवींद्र दुसर्‍या षटकात मोहसीन खानच्या चेंडूवर गोल्डन डक ठरला. त्याचा त्रिफळा उडाला. अजिंक्य व कर्णधार ऋतुराज यांची 29 (19 चेंडू) धावांची भागीदारी यश ठाकूरने तोडली. ऋतुराज 17 धावांवर झेलबाद झाला. चेन्नईला पॉवर प्लेमध्ये 2 बाद 51 धावा करता आल्या. अजिंक्य 24 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. मार्कस स्टॉयनिसने त्याच्या पहिल्या व सामन्यातील 12 व्या षटकात धोकादायक शिवम दुबेला (3) बाद करून लखनौला मोठे यश मिळवून दिले. समीर रिझवी (1) कृणालच्या गोलंदाजीवर बाद झाला; पण रवींद्र जडेजा दुसर्‍या बाजूने खिंड लढवत होता.

मोईन अलीने 20 चेंडूंत 3 षटकारांसह 30 धावांची दमदार खेळी केली. शेवटची दोन षटके उरली असताना महेंद्रसिंग धोनीने पुन्हा वादळ आणले आणि पहिल्या 4 चेंडूंत 12 धावा चोपल्या. धोनी या सामन्यात 9 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 28 धावांवर नाबाद राहिला. जडेजानेही 57 धावांची नाबाद खेळी करून चेन्नईला 6 बाद 176 धावांपर्यंत पोहोचवले.

हेही वाचा : 

Back to top button