सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी चार लाखांची सुपारी; बिहारात शिजला कट | पुढारी

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी चार लाखांची सुपारी; बिहारात शिजला कट

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा :  बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घराजवळील गोळीबार करण्याचा कट बिहारमध्ये शिजला आणि त्यासाठी कुख्यात बिष्णोई टोळीकडून त्यांना चार लाखांची सुपारी देण्यात आली होती, असे दोन्ही शूटर्सच्या चौकशीतून उघडकीस आले आहे.

केवळ दहशत निर्माण करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारासाठी त्यांना पैसे आणि हत्यार पाठविण्यात आले होते, ते त्यांना कोणी दिले याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या आरोपींच्या अटकेसाठी आता गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर पळून गेलेले शूटर विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल या दोघांना गुजरातच्या भूज येथून अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांची चौकशी सुरु आहे.

दोन्ही आरोपींनी गोळीबाराचा कट बिहारमध्ये शिजल्याचे सांगितले. त्यासाठी दोघांनाही चार लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यापैकी एक लाख रुपये त्यांना देण्यात आले होते. उर्वरित तीन लाख रुपये गोळीबारानंतर मिळणार होते. मात्र त्यापूर्वीच ते पकडले गेले आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांना ऑनलाईन 50 हजार रुपये पाठविण्यात आले होते. ही रक्कम त्यांना कोणी पाठविली हे समजलेले नाही. गोळीबारानंतर या दोघांनाही भूज येथे जाण्याचे आदेश मिळाले होते, त्यामुळे ते दोघेही मुंबईतून गुजरातला पळून गेले. भूजला जाण्यामागे त्यांचा काय उद्देश होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

या गुन्ह्यांचा तपासकामी गुन्हे शाखेचे पथक आता भूज, राजस्थान, बिहार आणि दिल्लीला जाणार आहे. बिहारहून मुंबईत आणि पनवेलला गेल्यानंतर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई हा दोघांच्या नियमित संपर्कात होता. त्याच्याकडूनच दोघांनाही पुढील सूचना मिळत होत्या असेही त्यांनी सांगितले.

बिष्णोईचा ताबा घेणार

सलमान खान याच्या घराजवळ झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी बिष्णोई टोळीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली असून याच गुन्ह्यांत लॉरेन्स बिष्णोईची मुंबई पोलिसांकडून कोठडी घेण्याची शक्यता आहे.

Back to top button