नाशिक तापले, उष्णतेच्या झळा, पारा चाळीशी पार | पुढारी

नाशिक तापले, उष्णतेच्या झळा, पारा चाळीशी पार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एप्रिल महिन्याच्या मध्यात जिल्ह्यातील उन्ह तळपत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (दि.१५) मालेगावचा पारा ४२ अंशावर पोहचला. तर नाशिकमध्ये ४०.४ अंश सेल्सियस पाऱ्याची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हे सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे. उन्हाच्या झळांनी नाशिककर हैराण झाले. सायंकाळनंतर वातावरणात बदल होत, ढगाळ हवामानासह जोरदार वारे वाहू लागले. काही ठिकाणी अवकाळीच्या रिमझिम सरी बरसल्या.

चालूवर्षी जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. एप्रिलच्या प्रारंभीपासून तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने वाढ होत आहे. मालेगावी सोमवारी पारा थेट ४२ अंशावर जाऊन पोहचल्याने स्थानिक नागरिक घामाघूम झाले. तर नाशिकमध्येही पाऱ्यांनी चाळीशी पार केली आहे. दिवसभर उष्म हवेचे झोत वाहत होते. सिमेंट आणि डांबरी रस्त्यातून अक्षरक्ष: उष्ण झळा बाहेर पडत होत्या. दुपारी ११ ते साडेचार यावेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक जाणवत होती.

बोहरपट्टी pudhari.news
नाशिक: दुपारच्या वेळी कडाक्याच्या उन्हामुळे वर्दळीचे ठिकाण असलेल्या बोहोर पट्टी येथे असलेला शुकशुकाट. (छाया : हेमंत घोरपडे)

सटाणा, कळवण, देवळ्यासह काही भागांत पाऊस 
दिवसभर उकाड्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरणात बदल झाला. ढगाळ हवामानासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. शहराच्या काही भागात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर निफाड, सुरगाणा, सटाणा, कळवण, देवळा या तालुक्यातील काही भागांसह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे ऊकाड्यातून काहिशी सुटका झाली. सुरगाण्यात वाऱ्यांमुळे काही घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. पुढील २४ तास वातावरणातील बदल कायम राहिल असा अंदाज आहे.

ऊकाड्याने नागरिक त्रस्त
उन्हाचा तडाखा बघता आठवड्याचा पहिला दिवस असूनही रस्त्यांवर सामसूम पाहायला मिळाली. तर उन्हापासून बचावासाठी घरोघरी व कार्यालयांमध्ये सुरू केलेल्या एसी, कुलर व पंख्यांमधूनही गरम हवा येत असल्याने नागरिक ऊकाड्याने त्रस्त झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ऊष्णतेची लाट कायम असल्याने जनजीवन दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले.

हेही वाचा:

Back to top button