शशिकांत शिंदेंचे विराट शक्तिप्रदर्शन | पुढारी

शशिकांत शिंदेंचे विराट शक्तिप्रदर्शन

सातारा; पुढारी वृत्तसेवा : शिंग तुतारीचा निनाद, ताशांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी अन् गगनभेदी घोषणांच्या माहोलात सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते नितीन बानुगडे-पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांच्यासह नेतेमंडळींच्या उपस्थितीत गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी विराट रॅली काढण्यात आली.

सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने सोमवारी प्रचाराचे रान आणखी तापवले. ‘मी येतोय तुमचा आशीर्वाद घ्यायला, फक्त साथ तुमची हवी’ या टॅगलाईनची पोस्टर्स रविवारी सातार्‍यात झळकली. त्यानंतर सोमवारी आ. शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: खा. शरद पवार सकाळी सातार्‍यात दाखलही झाले. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हेही स्वतंत्र हेलिकॉप्टरने सातार्‍यात आले. दुपारी 12 च्या सुमारास खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, डॉ. भारत पाटणकर, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितिन बानुगडे पाटील, आ. अरूण लाड, आण्णासाहेब डांगे, सत्यजित पाटणकर, सुनील माने, उदयसिंह पाटील उंडाळकर, डॉ. सुरेश जाधव, सुहास गिरी, सचिन मोहिते, हर्षल कदम, डॉ. नितीन सावंत, सारंग पाटील, दिपक पवार, राजकुमार पाटील, नरेश देसाई, तेजस शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत गांधी मैदानावरुन रॅली निघाली.

रॅलीमध्ये जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या प्रारंभी शिंग तुतार्‍यांचे पथक होते. त्यानंतर ढोल-ताशा पथक व पाठीमागे सजवलेला रथ होता. या रथामध्ये खा. शरद पवार, आ. जयंत पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, सौ. वैशाली शिंदे यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी होती. रॅली राजपथावरून पुढे देवी चौक, कमानी हौदापर्यंत आली. तेथून ती शेटे चौक, खालच्या रस्त्याने पोलिस मुख्यालय, शिवतीर्थ पोवईनाक्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. रॅली जसजशी पुढे सरकत होती तसतशी सहभागी कार्यकर्ते व नागरिकांची संख्या वाढत गेली. रॅलीत कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून येत होता.

रॅली पोवईनाक्यावर पोहोचताच कार्यकर्त्यांनी आ. शिंदे यांना उचलून घेतले. त्यांनतर स्व. यशंवतराव चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली. भर उन्हातही रॅलीत अबाल वृध्दासह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. तुतारी असलेला ध्वज हातात घेवून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, महाविकास आघाडीचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, शशिकांत शिंदे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला मोदी शहाचा बाप आला, एकच साहेब पवार साहेब, देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, वाघ आहे वाघ आहे शरद पवार वाघ आहे अशा विविध घोषणांनी रॅली मार्ग दणाणून सोडला. या रॅलीत पक्षाच्या विविध गाण्यांवर कार्यकर्त्यांनी ताल धरला होता.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅली आल्यानंतर रॅलीचे सभेत रूपातंर झाले. यावेळी खा. शरद पवार म्हणाले, सातारा हा पुरोगामी विचारांचा व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. सातारा राष्ट्रवादीच्या पाठीमागे नेहमीच उभा राहिला आहे. आता दोन हात करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तयार रहा. कष्टकरी नेता उभा राहिला आहे त्याला सर्वांनी साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील म्हणाले, मुठभर लोक सोडून गेले तरी जनता ही आमच्यासोबत आहे. आजच्या रॅलीतील नागरिकांच्या उपस्थितीने पवारसाहेबांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सातारचा बालेकिल्ला पुन्हा एकदा लोकसभेत झेंडा फडकावणार असल्याचे सांगितले. यानंतर आ. शशिकांत शिंदे, आ. पृथ्वीराज चव्हाण, प्रा. नितिन बानुगडे पाटील, सौ. वैशाली शिंदे, राजेंद्र शेलार व अन्य प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

Back to top button