‘जलसमृद्ध नाशिक’अभियानाला आजपासून सुरुवात, तब्बल साडेतीन कोटींचा खर्च | पुढारी

'जलसमृद्ध नाशिक'अभियानाला आजपासून सुरुवात, तब्बल साडेतीन कोटींचा खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील घटलेला भूजल साठा, यावर्षीचा दुष्काळ तसेच जिल्ह्यातील पाझर तलावामधील संपलेला पाणीसाठा बघता जिल्हा प्रशासनाने मोठ्या धरणांसोबतच गाळाने साचलेल्या पाझर तलावांतून गाळ काढण्यासाठी जलसमृद्ध नाशिक ही मोहीम हाती घेतली आहे. मंगळवार (दि. १६)पासून गंगापूर धरणाजवळील गंगावऱ्हे गावातून या मोहिमेला सुरुवात होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, मुख्य अभियंता आदी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने पंधरा तालुक्यांमधील १९१ पाझर तलावांमधून साडेसात लाख घनमीटर गाळ काढण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला तीन कोटी ३७ लाख रुपये खर्च होणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील पाझर तलावांमधील गाळही काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने याबाबतचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. यामध्ये तलावात नेमका किती गाळ साठला आहे, गाळ काढण्यासाठी अपेक्षित खर्च दिला आहे.

शेतकऱ्यांना मोफत गाळ
मोहिमेंतर्गत धरणांतून अथवा पाझर तलावातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना फक्त गाळ वाहून न्यायचा आहे. लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी केली जाणार असून, भविष्यात पाणीसाठा क्षमता वाढणार आहे.

हेही वाचा:

Back to top button