A career in the adventure field : साहसी क्षेत्रात करिअर करायचंय? | पुढारी

A career in the adventure field : साहसी क्षेत्रात करिअर करायचंय?

अनिकेत प्रभुणे

एखाद्या गावाला जेव्हा पुराने वेढले जाते, तेव्हा गावातील ग्रामस्थांना वाचवण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा कामाला लागते. आपत्कालीन यंत्रणेतील कर्मचारी आणि अधिकारी जीवाची बाजी लावून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवतात.

एखाद्या इमारतीला आग लागल्यास त्यापासून बचाव करणारी अग्निशमन यंत्रणा असो, दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करणारी सुरक्षा दलाची टीम असो, यासारख्या टीम किंवा पथक हे आपत्कालीन काळात कोणतीही तमा न बाळगता परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. या क्षेत्रात काम करण्यासाठी साहसाबरोबरच जिद्द असणे गरजेचे आहे. अनेक मंडळींना साहसी क्षेत्र आवडीचे असते. याशिवाय पॅराग्लायडिंग, बोटिंग यांसारख्या साहसी प्रकारातही करिअर करण्यासाठी अनेक तरुण उत्सुक असतात. समाजाचे रक्षण करतानाच स्वत: मात्र धोक्याची रेषा पार करण्याचे धाडस दाखवावे लागते. अशा क्षेत्रात करिअरसाठी तरुणांना मोठी संधी असून त्यापैकी काही क्षेत्राची माहिती आपल्याला घेता येईल.

गुन्ह्याचा शोध : तपास यंत्रणेत गुप्तचर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शेरलॉक होम्सच्या हेरकथा जगात प्रसिद्ध झाल्या आहेत. अत्यंत क्लिष्ट आणि अवघड गुन्ह्याचा शोध लावताना बुद्धीचा कस लागतो. अनेकांना अशा गुढकथा वाचायला आणि पाहायला आवडतात. यातूनच या क्षेत्रात करिअर करण्याची ओढ निर्माण होते. पोलिस खात्यात गुप्तचर विभागात नोकरी करण्यासाठी खात्यांतर्गत परीक्षा असतात. त्यानुसार निवड केली जाते. तसेच यासंबंधीची माहिती संबंधित खात्याच्या संकेतस्थळावरही मिळते. सीबीआय, सीआयडी, रॉ यांसारख्या नामांकित संस्थेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यांच्या पात्रतेच्या निकषात बसण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. याशिवाय खासगी गुप्तचर म्हणूनही करिअर करता येते. गुप्तचर म्हणून काम करताना धाडस आणि मानसिक समतोल राखणे गरजेचे असते.

पोलिस अधिकारी : पोलिस अधिकारी हे एक युनिफॉर्म करिअर मानले जाते. स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून पोलिस अधिकारी म्हणून करिअर निवडता येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट आयपीएस अधिकारी म्हणून निवड होते. पोलिस अधिकारी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही तर शारीरिक क्षमता, निर्णय क्षमता, परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य, गुन्ह्याचा बीमोड करण्याची ताकद अंगी असावी लागते. धाडस आणि धैर्य या जोरावरच यशस्वी पोलिस अधिकारी म्हणून नावारूपास येऊ शकतो.

अग्निशमन दल अधिकारी : फायर फायटर म्हणजेच अग्निशमन दलात काम करणे किंवा करिअर म्हणून निवड करणे कठीण मानले जाते. अग्निशमन दलाचे काम केवळ आगीवर नियंत्रण मिळवणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर आपत्कालीन स्थिती, दंगल, हिंसाचार, आग, पूरस्थिती, दहशतवादी हल्ला या काळातही अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी महत्त्वाचे कार्य करत असतात. दुर्गम भागात वैद्यकीय आणि खाद्यान्न सुविधा पुरवण्याचीही जबाबदारी असते. फायर फायटरना नेहमीच चोवीस तास अलर्ट राहावे लागते. आपत्कालीन स्थिती कधीही उद्भवू शकते, यामुळे अग्निशमन कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना फायर स्टेशनवरच राहावे लागते. शिफ्टनुसार कर्मचार्‍यात बदल होतो. उंचच उंच इमारतीवर आग लागल्यास हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कौशल्य अग्निशमन दलाचे अधिकारी करतात. प्रशिक्षण आणि सरावातून ते संकटावर मात करण्यास सदैव सज्ज असतात.

साहसी खेळाचे प्रशिक्षक : पॅराग्लायडिंग, राफ्टिंग, रॉक क्लायबिंग, गिर्यारोहण आदी क्षेत्रांत करिअर करण्यासाठी साहस गरजेचे आहे. या क्षेत्रात करिअरला खूप वाव आहे. थंड हवेच्या ठिकाणी किंवा उंच ठिकाणी असणार्‍या गावी पर्यटनासाठी आलेल्या मंडळींना पॅराग्लायडिंगची सफर घडवून आणणे, पॅराग्लायडिंगच्या स्पर्धेत सहभागी होणे, प्रशिक्षण देणे यांसारख्या गोष्टी पॅराग्लायडिंगच्या क्षेत्रातून साध्य करता येतात. गिर्यारोहकप्रेमींना प्रशिक्षण देणे, रिव्हर राफ्टिंग प्रशिक्षण आदींमध्ये करिअर करता येते. मात्र, खासगी पातळीवर प्रशिक्षण देणार्‍या अनेक संस्था आहेत. तेथून प्रशिक्षण घेऊन करिअरला सुरुवात करू शकतो.

रुग्णवाहिका चालक : रुग्णवाहिकेचा आवाज ऐकून आपण मार्ग मोकळा करून देतो, जेणेकरून रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील. जर गर्दीचे ठिकाण असेल तर रुग्णवाहिका बाहेर काढणे देखील अवघड बाब मानली जाते. तरीही चालक कौशल्याने मार्ग काढत रुग्णवाहिका वेगात नेऊन रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. रुग्णाचे प्राण वाचवणे एवढाच त्याचा उद्देश असतो. रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखली जात असल्याचे चालकाला चोवीस तास अ‍ॅलर्ट राहावे लागते. त्यामुळे रुग्णवाहिका चालक होण्यासाठी शारीरिक क्षमता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एकूण साहसी करिअरमध्ये रुग्णवाहिका चालकाचाही समावेश असून वाहन चालवण्याच्या उत्तम कौशल्याबराबेरच त्यावर नियंत्रण असण्याची हातोटीही असावी लागते.

Back to top button