छ.संभाजीनगर: टाकळी अंबड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बैल दगावले | पुढारी

छ.संभाजीनगर: टाकळी अंबड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बैल दगावले

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज (दि. १२) दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.  टाकळी अंबड (घेवरी) येथे एक शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. सुधाकर धोंडीराम पाचे (वय ६०, रा. टाकळी अंबड (घेवरी) ता.पैठण) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर  विहामांडवा, इंदेगाव परिसरात वीज पडल्याने बैल दगावले आहेत.

पैठण शहरासह ग्रामीण भागातील नांदर, विहामांडवा, इंदेगाव आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस जोरदार कोसळला.  अंबड (घेवरी) येथे सुधाकर पाचे बकऱ्या चारीत असताना  त्यांच्या अंगावर वीज पडून ते  गंभीर जखमी झाले. त्यांना पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तर विहामांडवा येथील अंकुश एकनाथ निंबाळकर, त्रिंबक एकनाथ निंबाळकर या भावांचे दोन बैल वीज पडून दगावले. इंदेगाव येथे देखील एक बैल दगावला.  नांदर परिसरात वाहनावर झाड पडल्याने नुकसान झाले. विहामांडवा – शहागड रोडवर बाभळीचे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. टाकळी अंबड येथील तलाठी सुवर्णा नाटकर यांनी शेतकऱ्यासह जनावराचा मृत्यू झालेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी करून तातडीने पंचनामा केला.

 हेही वाचा 

Back to top button