संशोधन, विकासातून ‘सहकार’ला चांगले दिवस : मा. सहकार आयुक्त अनिल कवडे | पुढारी

संशोधन, विकासातून ‘सहकार’ला चांगले दिवस : मा. सहकार आयुक्त अनिल कवडे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात ‘सहकार’ला सव्वाशे वर्षांची परंपरा असून संशोधन आणि विकासाची जोड देऊन काम झाल्यास ‘सहकार’ला यापुढेही चांगले दिवस येतील, असा विश्वास माजी सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केला. एखाद्या संस्थेचे लेखापरीक्षण करताना केवळ दोष काढणे बरोबर नसून त्यांनी केलेले चांगल्या प्रयोगांचीसुध्दा दखल घेऊन ते ज्ञान आपल्याबरोबर इतरांनाही वाटल्यास सर्वांचे जीवन सहकारातून समृध्द होईल, असेही ते म्हणाले.

‘असाध्य ते साध्य करिता सायास,कथा एका बँकेची’ या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशोगाथेवर आधारित असलेले आणि सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन कवडे यांच्यासह राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, दि कॉसमॉस को-ऑप बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, पणन संचालक विकास रसाळ, सहकारचे अपर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, नाबार्डचे माजी अधिकारी मोरेश्वर सुखदेवे, बँकिंग तज्ज्ञ गणेश निमकर यांच्या हस्ते बुधवारी (दि.10) सायंकाळी झाले, त्या वेळी ते बोलत होते.

विद्याधर अनास्कर म्हणाले, लोकशाही ही सहकाराचा पाया असून सहकारी संस्थेवर लोकनियुक्त संचालक मंडळाने संस्थेचा कारभार पाहण्याऐवजी सहकारी सभासदांना आणि सरकारला प्रशासकांची कारकीर्द हवीहवीशी वाटते आहे, याचा गंभीरपणे अंतर्मुख होऊन सहकार चळवळीने विचार करायला हवा. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे म्हणाले, सोलापूर जिल्हा बँक अडचणीतून बाहेर येऊन पुन्हा पूर्वपदावर आली.

हे तर सांघिक यश : कोतमिरे…

शैलेश कोतमिरे म्हणाले, सोलापूर जिल्हा बँकेच्या 2013 मध्ये असलेल्या ठेवी 3 हजार 476 कोटींवरून घटून 2018 मध्ये 1 हजार 858 कोटी रुपयांपर्यंत खाली आल्या. 247 कोटींचा तोटा होऊन पीक कर्जवाटप बंद झाले होते. कर्जवसुली ठप्प होती. मात्र, प्रशासक म्हणून मी पदभार घेतला आणि छोट्या उपाययोजनांपासून दीर्घकालीन उपाययोजना राबवित तसेच अधिकारी-कर्मचार्‍यांच्या सांघिक पाठबळावर 2023 मध्ये बँकेच्या ठेवी 4 हजार 250 कोटींवर नेल्या. हे सांघिक यश आहे.

हेही वाचा

Back to top button