आज रमजान ईदचा उत्साह; बाजारपेठांमध्ये लगबग, घरोघरी विशेष सजावट | पुढारी

आज रमजान ईदचा उत्साह; बाजारपेठांमध्ये लगबग, घरोघरी विशेष सजावट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये असलेली लगबग… घरोघरी विद्युतरोषणाईसह केलेली सजावट अन् बिर्याणीसह विविध खाद्यपदार्थांची तयारी… असे आनंदी वातावरण ईद ऊल फित्र अर्थात रमजान ईदनिमित्त मुस्लिम कुटुंबांमध्ये दिसून येत आहे. गुरुवारी (दि.11) रमजान ईद शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने मुस्लिम कुटुंबांमध्ये जय्यत तयारी करण्यात येत आहे. सीरत कमिटीने ईदनिमित्ताने मुस्लिम समाजबांधवांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुवारी सकाळी मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण होणार असून, ईदनिमित्त घराघरांमध्ये बिर्याणीसह शिरखुर्माची मेजवानी असणार आहे.

मुस्लिम समाजबांधव गुरुवारी एकत्र येऊन रमजान ईद उत्साहात साजरी करणार असून, घराघरांमध्येही आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. नवीन कपडे परिधान करून मुस्लिम बांधव ईद साजरी करतात. घरांमध्ये बिर्याणीसह शिरखुर्मा असे विविध पदार्थ तयार करण्यात येणार असून, एकत्र येऊन सहकुटुंब याचा आस्वाद घेतला जाणार आहे. शहर आणि उपनगरातील विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेळेनुसार सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. कोंढवा, वानवडी, हडपसर, खडकी, कॅम्प परिसर, औंध, बोपोडी आदी ठिकाणी असलेल्या मशिदींमध्ये नमाज पठण होणार आहे. काही ठिकाणी सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले आहे. तर मोठ्यांकडून छोट्यांना ईदी दिली जाणार आहे. पुणे – सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदानात शनिवारी सकाळी नऊ वाजता नमाज अदा होईल. हजारो मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज पठण करणार आहेत, अशी माहिती ईदगाह मैदान कमिटीचे झैनूल काझी यांनी दिली.

घरोघरी आकर्षक सजावट

रमजान ईद निमित्ताने मुस्लिम नागरिकांच्या घरी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुटुंबीयांतील सर्वजण नवीन कपडे घालून ईद साजरी करणार आहेत. घरोघरी रमजान ईद निमित्ताने आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. तसेच घरही उत्साहाने सजविण्यात आले आहे.

खाद्यपदार्थांची रेलचेल

रमजानच्या महिन्यातील शेवटचा रोजा (उपवास) बुधवारी ठेवण्यात आला. त्यानिमित्ताने सायंकाळी सात वाजता रोजा सोडण्यात आला. मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन रोजा सोडला. यानिमित्ताने कौसरबाग परिसर, कॅम्प परिसर, कोंढवा, वानवडी आदी ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. बिर्याणीसह विविध खाद्यपदार्थांवर ताव मारण्यात आला.

आठ वर्षीय अदिने केले रमजानचे उपवास

पिंपरी – पिंपरी- चिंचवड विद्यापीठातील मार्केटिंग हेड जमीर मुल्ला यांचा मुलगा आणि सामजिक कार्यकर्ते दस्तगीर मुल्ला यांचा आठ वर्षीय नातू अदि जमीर मुल्ला याने आपल्या पहिल्या रमजानचे सर्व 30 रोजे यशस्वीपणे पूर्ण केले. त्याच्या लहान वयात रमजानच्या उष्णतेत उपवास करत असल्याने प्रत्येक दिवसाच्या 14 तासांपेक्षा जास्त कालावधीचे उपवास करून उत्कृष्ट समर्पण आणि दृढसंकल्प दाखविला. शाळेच्या दिवसचर्येसह त्याची कामगिरी सांभाळताना त्याने केलेले रोजे खरोखरच प्रेरणादायी ठरते.

रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेमधील सर्वात महत्त्वाचा महिना समजला जातो. हे जगभरातील मुस्लिम साजरे करत असलेलं आत्मिक परिशुद्धता, स्वयंसुधारणा आणि उच्च समर्पणाची वेळ आहे. या महिन्यात, लोक इबादत, विचारशीलता, दानधर्मांच्या कृतींमध्ये सहभागी होतात व आपल्या आत्मिक आणि नैतिकता सुधारण्याचा प्रयत्न करतात. अदि जमीर मुल्ला याने 30 दिवसांचे उपवास पूर्ण केल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे.

बाजारपेठांमध्ये गर्दी

ईदच्या पूर्वसंध्येला विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली. नवीन कपड्यांच्या खरेदीसह मुस्लिम बांधवांनी खाद्यपदार्थांचीही खरेदी केली. कॅम्प, कोंढवा, वानवडी, खडकी येथील बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळाली.

हेही वाचा

Back to top button