पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वेमध्ये बेकायदेशीरपणे घुसून अनधिकृतरीत्या खाद्यपदार्थ आणि परवानगी नसलेल्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रासपणे विक्री सुरू आहे. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून अशा अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, त्यांना रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे समोर येत आहे. रेल्वेत घुसून अनधिकृतरीत्या खाद्यपदार्थ आणि नॉन ब—ँडच्या पाण्याच्या बाटल्या विकणारे अनधिकृत विक्रेते समोर आले आहेत. नुकतीच अशी घटना कोयना एक्स्प्रेसमध्ये (ट्रेन क्रमांक 11029) घडली. दोन विक्रेत्यांनी कोणतीही भीती न बाळगता सर्रास कोयना एक्स्प्रेसमध्ये घुसखोरी केली. प्रवाशांना अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये खाद्यपदार्थ विकण्यास सुरुवात केली. यासोबतच रेल्वेत विक्रीस परवानगी नसलेल्या ब्रॅंडच्या पाण्याच्या बाटल्या चक्क 20 रुपयांना विकल्या.
त्यांच्याकडे कोणतेही आयकार्ड नव्हते. रेल्वेमध्ये फक्त 'रेलनीर' या रेल्वेच्या ब्रॅंडच्या पाण्याच्या बाटल्या विकण्यास परवानगी आहे. त्याही 15 रुपयांना उपलब्ध आहेत. मात्र, असे असतानाही या अनधिकृत विक्रेत्यांनी घुसखोरी करत, लुटमार सुरू केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, प्रवासी विजय खोमाने यांनी याबाबत तत्काळ रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बलाकडे (आरपीएफ) तक्रार केली. परंतु, असे विक्रेते अनधिकृतपणे अनेक रेल्वे गाड्यांमध्ये आपली दुकानदारी सर्रासपणे चालवत आहेत. हे थांबविणे प्रशासनाला शक्य का होत नाही, प्रशासनाचे, आरपीएफचे या अनधिकृत विक्रेत्यांशी लागेबांधे आहेत का? असा सवाल रेल्वे प्रवाशांना सातत्याने पडत आहे. आता पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे आणि रेल्वे सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा या दोन पुणे विभागाच्या मुख्य महिला अधिकारी काय पवित्रा घेणार आहेत, हे आता पाहावे लागणार आहे.
प्रवासी विजय खोमणे यांनी या घटनेची तक्रार प्रशासनाला करताच, रेल्वे सुरक्षा बलाकडून त्या दोन्ही अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर रेल्वे सुरक्षा कायदा 144 (अ) नुसार कारवाई झाली. मात्र, अशी कारवाई केल्यावरही अनधिकृत विक्रेते स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये का दिसतात, असा प्रश्नही प्रवाशांना पडला आहे.
हेही वाचा